डेंग्यूचा कहर की भीती दाखवून लूट?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:35 IST2021-09-04T04:35:38+5:302021-09-04T04:35:38+5:30
हिंगोली : जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांमध्ये डेंग्यूचा आजार झाल्याचे सांगून रुग्णांना भरती करण्याचा धंदा जोरात सुरू आहे. आरोग्य विभाग मात्र ...

डेंग्यूचा कहर की भीती दाखवून लूट?
हिंगोली : जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांमध्ये डेंग्यूचा आजार झाल्याचे सांगून रुग्णांना भरती करण्याचा धंदा जोरात सुरू आहे. आरोग्य विभाग मात्र जिल्ह्यात आतापर्यंत एकाचाही अधिकृत अहवाल आला नसल्याचे सांगत आहे. त्यामुळे भीती दाखवून लूट तर सुरू नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
हिंगोली जिल्ह्यात ताप, अंगदुखी, डोकेदुखी, सांधेदुखी अशी डेंग्यूसदृश असलेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे. मात्र, विविध प्रकारच्या व्हायरल आजारांमध्ये ही समान लक्षणे आढळतात. त्यात डेंग्यूचे निदान होण्यासाठी सेंटीनल लॅब अर्थात केंद्रीय प्रयोगशाळेचा अहवाल महत्त्वाचा मानला जातो. बाहेर मिळणाऱ्या रॅपिड टेस्टवर तेवढा विश्वास ठेवला जात नाही. जिल्हा आरोग्य विभागाचेही तसेच म्हणणे आहे. जिल्ह्यात डेंग्यूसदृश लक्षणे आढळलेल्या जवळपास ५० जणांचे सिरम केंद्रीय प्रयोगशाळेला परभणी येथे पाठविले होते. मात्र, त्यातून एकही बाधित आला नाही. जिल्हा सामान्य रुग्णालयातही डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण दाखल झाल्याने पंधरा ते वीसजणांचे सिरम पाठविले. त्यापैकीही कुणी बाधित असल्याचे समोर आले नाही. त्यामुळे एकीकडे डेंग्यूचा कहर असताना दुसरीकडे आरोग्य विभागाकडे तशा नोंदी होत नसल्याचे दिसत आहे. खासगी रुग्णालयांनीही डेंग्यूचा रुग्ण आढळल्यास आरोग्य विभागास कळविणे गरजेचे आहे. त्याचे सिरम तपासणीस द्यावे लागते. मात्र, खासगीतून आतापर्यंत अशा पद्धतीने कोणीच सिरम पाठविले नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे डेंग्यूचा धाक दाखवून लूटमार सुरू असल्याची शंका वाढत आहे. अनेक रुग्णालयांत रोज पाच ते पंधराजणांना डेंग्यूचे निदान करून भरती केले जात आहे. खासगी प्रयोगशाळेच्या अहवालावर जर रुग्ण गृहितच धरला जात नसेल तर मग आजार कोणता समजायचा? हा प्रश्नच आहे. दुसरे म्हणजे जर तो आजारच नसेल तरीही प्लेटलेटस् कमी झाल्याने तसा अंदाज बांधला जात असल्यास उपचारावरही प्रश्नचिन्हच आहेत. त्यातच भरती करण्याचा मोठा खर्चही रुग्णाला सोसावा लागत आहे. याकडे आरोग्य विभागाने लक्ष देणे गरजेचे बनले आहे.
डेंग्यूचा एकही रुग्ण नाही
हिंगोली जिल्ह्यात सिरम तपासणीत एकही डेंग्यू रुग्ण निष्पन्न झाला नाही. आम्ही ५० जणांचे सिरम पाठविले होते. त्यामुळे डेंग्यूची साथ म्हणणे चुकीचे आहे. खासगी रुग्णालयांनीही आरोग्य विभागाला तसे कळविणे अभिप्रेत आहे. मात्र, तसे कोणी कळविले नाही. एकही बाधित न आढळल्याने रुग्णांनी घाबरून न जाता शासकीय सेवेचा लाभ घ्यावा, एवढेच सांगता येईल, असे डॉ. शिवाजी पवार यांनी सांगितले.
डेंग्यूसदृश मात्र डेंग्यू रुग्ण नाही
जिल्हा रुग्णालयात डेंग्यूसदृश लक्षणे असलेले रुग्ण दाखल झाले आहेत. मात्र, डेंग्यूचा एकही रुग्ण नाही. त्यामुळे बाहेरही डेंग्यूचा रुग्ण आढळल्याची अधिकृत खातरजमा केल्याशिवाय सांगता येणार नाही. खासगीतूनही सिरम नमुने घेऊन तपासणी करता येते. त्यामुळे रुग्णांनी अशी तपासणी करून घेतली पाहिजे, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.राजेंद्र सूर्यवंशी यांनी सांगितले.