प्लाॅटची विक्री, मात्र सातबारा मुळ मालकाच्या नावावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:29 IST2020-12-29T04:29:06+5:302020-12-29T04:29:06+5:30
वसमत : येथे प्लॉट खरेदी करुन घर बांधलेल्यांपैकी किती जण त्या घराचे खरे मालक आहेत हे शोधण्याची वेळ आली ...

प्लाॅटची विक्री, मात्र सातबारा मुळ मालकाच्या नावावर
वसमत : येथे प्लॉट खरेदी करुन घर बांधलेल्यांपैकी किती जण त्या घराचे खरे मालक आहेत हे शोधण्याची वेळ आली आहे. त्यांच्याच नावावर संपूर्ण जमिनीचा सातबारा कायम आहे. सातबारावर भविष्यात खरेदी - विक्री किवा बँक कर्जाचे प्रकरण झाले तर प्लॉट खरेदी करणाऱ्यांना हात चोळत बसण्याची वेळ येणार आहे.
वसमतमध्ये बनावट एनए लेआऊट करुन प्लॉटविक्रीचा सपाटा सुरू आहे. काेणतीही शहानिशा न करता प्लॉट खरेदी करणाऱ्यांची संंख्याही जास्त आहे. केवळ नमुना नं. आठच्या आधारावर कोणताच शासकीय आधार नसलेल्या नकाशाच्या आधारावर भूखंड पाडले जातात. पाटी लावून नगरास एखादे नाव दिले जाते. दलालांना कमिशन देऊन शिकार शोधली जाते. नोकरदार व वरकमाई असलेल्यांची सहजच शिकार हाेते. एकाने घेतला म्हणून दुसरा खरेदी करतो. रजिष्ट्री कार्यालयातही बनावट नकाशे व सातबाराच्या आधारे रजिष्ट्री केली जाते. खरेदी करणाऱ्याच्या नावाने खरेदीखत नोंदणीकृत होते. रजिष्ट्रीलाच मालकी समजून घराचे बांधकामही होत आहे. या घरांना बांधकाम करण्याची परवानगी नाही. सर्व भूखंड विक्री झाले तरी जमिनीचा सातबारा मूळ मालकाच्या नावावर कायम आहे. अधिकृत एनए लेआऊट मंजूर नाहीत. त्यामुळे विकलेली जमीन सातबारावरुन कमी होत नाही. लाखाे रुपये देऊन खरेदी केलेल्या प्लॉटची मालकी कोणाची? हा प्रश्न भविष्यात उपस्थित होण्याची भीती आहे. सहाय्यक उपनिबंधक कार्यालय फक्त रजिष्ट्री करुन नोंदणी करते. हा दस्तऐवज मालकी हक्काचा पुरावा नाही, असे फलकच रजिष्ट्री कार्यालयात लावलेले असतात.
नगरपालिका हद्दीत हे भूखंड येत नाहीत. ग्रामपंचायत एनए म्हणून फसवणुकीचे प्रकार वसमतमध्ये वाढले आहेत. भूमाफियांच्या टोळ्या तयार झाल्या आहेत. कागदोपत्री हेराफेरी करुन प्लॉट एनए असल्याचा प्रचार केला जातो. त्यानंतर प्लॉट विक्री करुन या टोळ्या प्रचंड नफा कमावत आहेत. बनावट कागदपत्रांच्या आधारावर रजिष्ट्री करुन देऊन पैसे रोख वसूल करुन भूखंड माफिया मोकळे होत आहेत. वसमतमध्ये विक्री झालेल्या बहुतेक भुखंडांचा सातबारा हा मूळ मालकांच्या नावावर आहे. यातील काही जणांचे सातबारा नावाने असल्याने बँकेतून कर्ज प्रकरणेही केली आहेत. अनेकांनी पुन्हा जमिनी बिल्डरला विक्री केल्या आहेत. आता हे बिल्डरला विक्री केलेल्या जमिनी ताब्यात घेऊ शकतात. भूखंड विकलेल्या जमिनीचा सातबारा मूळ मालकांच्या नावावर असल्याने कायदेशीर तेच मालक ठरतात. अशावेळी भूखंड धारकांना मालकी सिद्ध करणे अवघड होणार आहे. जमीन मालकांच्या वारसदारांनी सातबाराच्या आधारावर जमिनीवर दावा केला तर भूखंडावर पाणी सोडण्याची वेळ येणार आहे, अशी अनेक प्रकरणे सध्या वादग्रस्त आहेत. त्यांचा वाद मिटता मिटत नाही. तरीही अनधिकृत एनए आणि बनावट कागदपत्रांच्या आधारावर नव्याने प्लॉट खरेदी - विक्री सुरूच आहे. भूखंड खरेदी करताना अधिकृत एनए झालेला आहे की नाही, याची खात्री करुन व्यवहार करण्याची गरज आहे. अन्यथा तुम्ही बांधलेल्या घरावर भलतेच मालकी सांगू शकतात.
वसमत - आसेगाव रस्त्यावरील भूखंडांना सध्या सोन्यासारखा भाव आला आहे. यातील अनेकांकडे हा धक्कादायक प्रकारसमोर येत आहे. नगरपालिका हद्दीत न येणाऱ्या जमिनीवर नगरपालिकेचे गट नंबर देण्याचे आश्वासन देऊन फसवणुकीचे प्रकार होत आहेत. ग्रामपंचायत एनएच्या नावाने होणाऱ्या भूखंड खरेदी - विक्री प्रकरणात प्लॉट धारकांची फसवणूक होत आहे.