एस. टी. कर्मचाऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:35 IST2021-09-08T04:35:24+5:302021-09-08T04:35:24+5:30
हिंगोली : एस. टी. कर्मचाऱ्यांएवढे कोणीच जास्तीचे काम करु शकत नाही. परंतु, त्यांनाच वेळेवर पगार मिळत नाही. ...

एस. टी. कर्मचाऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही
हिंगोली : एस. टी. कर्मचाऱ्यांएवढे कोणीच जास्तीचे काम करु शकत नाही. परंतु, त्यांनाच वेळेवर पगार मिळत नाही. ही खेदाची बाब आहे. यापुढे एस. टी. कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार नाही, याची दखल घेतली जाईल, असे प्रतिपादन आ. संतोष बांगर यांनी केले.
५ सप्टेंबर रोजी शहरात एस. टी. कामगार सेनेच्या वतीने एस. टी. कामगारांची बैठक घेण्यात आली. आ. बांगर म्हणाले, गत दोन वर्षांपासून कोरोनाने सळो की पळो करुन सोडले आहे. कोणीही बाहेर निघण्यास तयार नाही. परंतु, एस. टी. महामंडळाचे चालक, वाहक व इतर कर्मचारी शासनाच्या आदेशानुसार जीवाची पर्वा न करता मुंबईला जाऊन एस. टी. महामंडळाचे काम करत आहेत. मग अशावेळी कोणीतरी त्यांच्या पाठिशी उभे राहायला पाहिजे. यापुढे एस. टी. कर्मचाऱ्यांचा पगार वेळेवर होईल, यासाठी प्रयत्न केले जातील.
याप्रसंगी राम कदम यांची शिवसेनेच्या युवा जिल्हा अध्यक्षपदी निवड तसेच डी. आर. दराडे यांची औरंगाबाद प्रादेशिक सचिवपदी, जळगाव संपर्कप्रमुख निवड झाल्याबद्दल आ. संतोष बांगर यांच्या हस्ते दोघांचा सत्कार करण्यात आला.
बैठकीला विभागीय उपाध्यक्ष मो. इस्माईल, ज्येष्ठ कार्यकर्ते भाऊराव कऱ्हाळे, आगार सचिव गजानन सांगळे, आगार अध्यक्ष ज्ञानेश्वर दराडे, गोपाल गिरी, पी. डी. घुगे, सुवर्णा घोटेकर, सीमा पतंगे, मीना आंभोरे, पवार, हागवणे, सीडाम, पूजा वाणी, पुंडगे, कुऱ्हे, कपाटे तसेच हिंगोली, परभणी, कळमनुरी, वसमत आदी विभागातील एस. टी. कर्मचारी उपस्थित होते.