ग्रामविकास, महसूल खात्यात लाचखोर अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:46 IST2021-02-23T04:46:06+5:302021-02-23T04:46:06+5:30

हिंगोली : जिल्ह्यात २०१९ ते २०२१ या काळात २५ लाचखोर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले. यात सर्वाधिक ८ लाचखोर ...

Rural development, more corrupt in revenue department | ग्रामविकास, महसूल खात्यात लाचखोर अधिक

ग्रामविकास, महसूल खात्यात लाचखोर अधिक

हिंगोली : जिल्ह्यात २०१९ ते २०२१ या काळात २५ लाचखोर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले. यात सर्वाधिक ८ लाचखोर हे ग्रामविकास विभागातील असून, त्यानंतर महसूल विभागातील ५ लाचखोरांचा क्रमांक लागतो. विशेष म्हणजे ४० ते ४५ वयोगटातील सरकारी बाबूंना पैशाचा मोह अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सेवा पुरविताना भ्रष्टाचारमुक्त पारदर्शक कारभार करण्याचे शासनाचे धोरण आहे. मात्र, अनेक शासकीय कर्मचारी, अधिकारी कोणतेही काम पैसे घेतल्याशिवाय करीत नसल्याचे चित्र आहे. यातूनच लाचखोरीचे प्रमाण वाढत आहे. अशा लाचखोरांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने कारवाई केली जाते. २०१९ ते २०२१ या काळात जिल्ह्यातील २५ लाचखोर या एसीबीच्या सापळ्यात अलगद सापडले आहेत. यात सर्वाधिक लाचखोर हे ग्रामविकास विभागातील असून त्यानंतर महसूल, कृषी, गृह, वित्त, आरोग्य, शिक्षण खात्याचा क्रमांक लागतो.

पंचेचाळीशीतील सरकारी बाबूंना सर्वाधिक पैशांचा मोह

१ लाच स्वीकारण्यात सर्वच विभागांतील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये सर्वाधिक कर्मचारी हे ग्रामविकास विभागातील असून, त्यांची संख्या ८ आहे. त्यानंतर महसूल ५, कृषी व गृह प्रत्येकी ३, वित्त विभाग २, इतर २ तर शिक्षण, आरोग्य विभागातील एका लाचखोर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

२ सर्वात जास्त पैशांचा मोह ४१ ते ५० वयोगटातील लाचखोर कर्मचाऱ्यांना असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. या वयोगटातील तब्बल १४ कर्मचारी लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात सापडले आहेत.

३ त्यानंतर ३१ ते ४० वयोगटातील ७ कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लावलेल्या सापळ्यात सापडले. याही वयोगटातील कर्मचाऱ्यांना पैशाचा मोह जास्त असल्याचे दिसत आहे.

४ मागील दोन वर्षांत २१ ते ३० व ५१ ते ६० वयोगटातील कर्मचाऱ्यांना पैशाचा मोह जास्त नसल्याचे दिसून येत आहे. दोन वर्षांत २१ ते ३० वयोगटातील १ तर ५१ ते ६० वयोगटातील ३ कर्मचारी लाच घेताना सापडले आहेत.

प्रतिक्रिया...

कोणताही शासकीय कर्मचारी, अधिकारी अथवा त्यांच्या वतीने खाजगी व्यक्ती त्याचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी करीत असेल तर नागरिकांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या टोल फ्री क्रमांक १०६४, दूरध्वनी क्रमांक ०२४५६-२२३०५५ किंवा ९९२३०४२५६५ या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधावा.

- नितीन देशमुख,

प्रभारी पोलीस उपाधीक्षक, हिंगोली

Web Title: Rural development, more corrupt in revenue department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.