हिंगोलीत अतिक्रमणधारकांची धावाधाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 00:32 IST2018-03-10T00:32:14+5:302018-03-10T00:32:23+5:30
शहरातील जलेश्वर तलावाच्या सुशोभिकरणासाठी तलाबकट्टा परिसरातील अतिक्रमणधारकांना तहसीलने नोटिसा बजावल्या आहेत. यात काहींनी तर आमची अनेक दिवसांची मालकी असल्याचे सांगून तहसीलदारांकडे धाव घेतली.

हिंगोलीत अतिक्रमणधारकांची धावाधाव
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : शहरातील जलेश्वर तलावाच्या सुशोभिकरणासाठी तलाबकट्टा परिसरातील अतिक्रमणधारकांना तहसीलने नोटिसा बजावल्या आहेत. यात काहींनी तर आमची अनेक दिवसांची मालकी असल्याचे सांगून तहसीलदारांकडे धाव घेतली. त्यांनी याबाबत पुरावे सादर करण्यास सांगितले आहे.
जलेश्वर तलावालगतच्या जवळपास ४00 जणांना अशा प्रकारच्या नोटिसा आल्या आहेत. २८ फेब्रुवारीच्या नोटिसांत ९ मार्च ही अंतिम तारीख असल्याने आज तहसीलला गर्दी वाढली होती. यापैकी काहींची अतिक्रमणे तर काहीजण जागेची मालकीस असल्याचे सांगत आहेत. या भागातील साठ ते ७0 जणांनी तहसीलदार गजानन शिंदे यांची भेट घेवून कैफियत मांडली. गेल्या अनेक दिवसांपासून रहिवासी असताना अचानक व विलंबाने नोटिसा आल्या. ९ मार्चपर्यंतच अतिक्रमण पुरावे सादर करण्यास मुदत दिल्यानेही काहींनी नाराजी व्यक्त केली. तर ज्यांची मालकी आहे, अशांनी तहसीलला पुरावे सादर करावे, अशा सूचना शिंदे यांनी दिल्या.
आधी पुनर्वसन करा
याबाबत राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने तहसीलदारांना निवेदनही दिले. त्यात म्हटले की, ६0 ते ७0 वर्षांपासून हे लोक येथे राहतात. शांततामय मार्गाने ते ताबेदार आहेत. घरपट्टी, नळपट्टी भरतात. अनेक दिवसांची वीजबिले आहेत. १९९0 पूर्वीच्या अतिक्रमणांना कायम करण्याचा शासन आदेश आहे. त्यामुळे विकासाच्या नावाखाली या लोकांना थेट बेघर करू नये. आधी त्यांचे पुनर्वसन करावे. नंतरच विकासकामे करावीत, अशी मागणी रासपचे विनायक भिसे यांनी केली. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.