RT-PCR laboratory started at Hingoli; The e-inauguration was inaugurated by Guardian Minister Varsha Gaikwad | हिंगोलीतील आरटी-पीसीआर प्रयोगशाळा सुरु; पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते झाले ई-उद्घाटन

हिंगोलीतील आरटी-पीसीआर प्रयोगशाळा सुरु; पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते झाले ई-उद्घाटन

ठळक मुद्देखासदार राजीव सातव यांच्या प्रयत्नांना यश

हिंगोली : जिल्हा सामान्य रुग्णालय इमारत परिसरात उभारण्यात आलेल्या कोविड-१९ विषाणू परीक्षण संशोधन व निदान (आरटी-पीसीआर) प्रयोगशाळेचे ई-उद्घाटन पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात आले. या प्रयोगशाळेची क्षमता दर दिवशी 200 ते 300 आरटी-पीसीआर चाचण्यांची आहे. यामुळे हिंगोली जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचे निदान जलद होणार आहे. 

हिंगोलीत जिल्ह्यातील आरटी-पीसीआर ही कोरोनाची महत्वपूर्ण चाचणी करणारी प्रयोगशाळा नसल्यामुळे आतापर्यंत सर्व नमुने नांदेडला पाठवावे लागत होते. मात्र आता हिंगोलीतच सदर चाचण्या होणार आहेत. त्यासाठी लागणाऱ्या प्रयोगशाळेची उभारणी 2.25 लाख खर्च करून करण्यात आली आहे. या प्रयोगशाळेसाठी आवश्यक असलेली मशिनरी वेगवेगळया ठिकाणी आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनानुसार बसविण्यात आल्या आहेत. प्रत्येक प्रक्रियेसाठी सुसज्ज कक्ष व पुरेशा जागेची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच जिल्हा सामान्य रूग्णालय येथील प्रयोगशाळेत सर्व कामांची तांत्रिक तपासणी करून आवश्यक मनुष्यबळ नियुक्त करण्यात आले आहे. या प्रयोगशाळेच्या उभारणीनंतर व इतर आवश्यक व्यवस्थेबाबत खात्री पटल्यानंतर एम्सकडून कोरोना चाचणी तसेच इतर तपासण्या सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. 

यावेळी खासदार राजीव सातव,आ.संतोष बांगर, आ.बिप्लव बाजोरिया, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्यासह जि.प मुख्यकार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा, जि.प उपाध्यक्ष मनिष आखरे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, जिल्हा शल्य चिकित्सक राजेंद्र सूर्यवंशी, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, डॉ. शिवाजी पवार, डॉ. दीपक मोरे, डॉ. गोपाल कदम, डॉ. संजीवन लखमावार, डॉ. जिरवणकर, डॉ. शिबा तालिब, डॉ. पुंडगे, डॉ. चव्हाण, अधिपरिचारिका जोशी, उद्धव कदम आदींची उपस्थिती होती.

रिपोर्ट येण्याचा वेळ वाचणार
हिंगोली जिल्ह्यात विविध आजारांबाबतच्या तपासण्या या लॅबमध्ये होणार आहेत. ही प्रयोगशाळा आरोग्य विभागासाठी चांगली उपलब्धी झाली आहे. कोरोना महामारीत या प्रयोगशाळेमुळे तपासण्यांना गती मिळणार आहे. ही आरटी-पीसीआर प्रयोगशाळा अत्याधुनिक व प्रशस्त स्वरुपात आहे. आता जिल्ह्यातच कोरोना चाचणीचे निदान होणार असल्यामुळे नांदेडहून अहवाल येण्यास लागणारा दोन ते तीन दिवसांचा कालावधी वाचणार आहे. आरटी-पीसीआर चाचण्यांमुळे रुग्णांवर केली जाणारी उपचार प्रक्रियाही जलद होईल.

खा. राजीव सातव यांच्या प्रयत्नांना यश
खा.राजीव सातव यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्याकडे हिंगोलीत आरटी-पीसीआर प्रयोगशाळा सुरु करण्याची मागणी केली असता. त्यांनी ही मागणी मंजूर करण्या संदर्भात संबधितांना पत्राद्वारे कळविले. त्यानंतर प्रयोगशाळा उभारणीसाठी लागणारा निधी पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी जिल्हा नियोजनमधून उपलब्ध करुन दिला. या कामाचा खा.सातव यांनी सतत पाठपुरावा केल्याने आज या प्रयोगशाळेचे उद्घाटन झाले. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारणी करण्यासाठी आगामी काळात प्रयत्न करणार असल्याचे पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले. यामुळे जिल्हा आरोग्य सेवेत आणखी एक मैलाचा दगड ठरणार आहे.

गैरसोय टळणार
वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी ही प्रयोगशाळा मंजूर करून निधी पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी दिला आहे. त्यामुळे आता जनतेची गैरसोय टळली आहे. दरम्यान दररोज तीनशे रुग्णांची तपासणी करणे शक्य होणार असून वेळेत अहवाल प्राप्त होत होणार असल्यामुळे रुग्णांवर उपचार करण्याबरोबरच मृत्यू टाळण्यासाठी ही सुविधा अतिशय उपयोगी ठरणार असल्याचे प्रतिपादन यावेळी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी केले.

Web Title: RT-PCR laboratory started at Hingoli; The e-inauguration was inaugurated by Guardian Minister Varsha Gaikwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.