खटकाळी उड्डाणपुलानजीकचा रस्ता बनला जीवघेणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:03 IST2021-09-02T05:03:31+5:302021-09-02T05:03:31+5:30
हिंगोली शहर रेल्वे पटरीच्या दुसऱ्या बाजूलाही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यातच हिंगोली शहरात प्रवेश करण्यासाठी हा नांदेडकडून येणारा मुख्य ...

खटकाळी उड्डाणपुलानजीकचा रस्ता बनला जीवघेणा
हिंगोली शहर रेल्वे पटरीच्या दुसऱ्या बाजूलाही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यातच हिंगोली शहरात प्रवेश करण्यासाठी हा नांदेडकडून येणारा मुख्य मार्ग आहे. त्यामुळे या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक आहे, तर हिंगोलीहून जाणाऱ्या व येणाऱ्या रेल्वेंची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे या ठिकाणच्या रेल्वेगेटवर मोठी वाहतूककोंडी होत होती. ती टाळण्यासाठी या पुलाचे काम सुरू झाले आहे. मात्र, दीड वर्षानंतरही ते पूर्ण झाले नाही. आणखी किती दिवस लागतील, याचाही काही मेळ नाही. या रस्त्याच्या कामामुळे मागील वर्षभरापासून नागरिक त्रास सोसत आहेत. मात्र, हा पूल झाल्यावर सर्व त्रासांतून मुक्तता होणार या आशेने या ठिकाणच्या अतिशय दयनीय अवस्थेत असलेल्या पर्यायी रस्त्याचीही कुणी तक्रारही आजपर्यंत केली नाही. त्याचा गैरफायदा रेल्वे विभागाचे उदासीन अधिकारी व संबंधित कंत्राटदार घेत आहेत. रात्री-बेरात्री कर्णकर्कश आवाजांमुळे आजूबाजूच्या वस्तीतील नागरिक हैराण आहेत, शिवाय या ठिकाणी गर्डर चढविताना कोणतीही सुरक्षा पाळली जात नाही. शेजारून वाहतूक सुरू असताना क्रेन गर्डर चढविण्याचा धोका पत्करला जातो. अशा बेदरकार पद्धतीने काम सुरू असताना, दुसरीकडे नागरिकांना पर्यायी रस्त्यावरून व्यवस्थित जाता येईल, ही व्यवस्थाही केली जात नाही. दीड ते दोन फूट खोलीचे खड्डेही बुजले जात नाहीत. या ठिकाणी मुरुमासह गिट्टी टाकून खड्डे बुजविणे गरजेचे असताना, त्यात चक्क मोठमोठे दगड टाकले. या ठिकाणी रात्रीच्या वेळी अंधार असतो. सायकलवरून ये-जा करणाऱ्यांना खड्डे व दगडही दिसत नाहीत. अनेक जण या ठिकाणी घसरून पडत आहेत. सध्या तर इतका चिखल झाला की, दुचाकी चालकांचे पूर्ण कपडे खराब होत आहेत. निसरड्या रस्त्यावरून महिलांना दुचाकी चालविणे कठीण बनले आहे. याचे रेल्वे विभाग अथवा संबंधित कंत्राटदाराला कोणतेच सोयरसुतक नाही. जर या रस्त्याची सुधारणा लवकर झाली नाही, तर हनुमाननगर, जीनमातानगर, कारवाडीतील नागरिक आंदोलन छेडण्याच्या तयारीत आहेत.