रस्ता झाला मोठा अन् निवारा झाला छोटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:32 IST2021-02-09T04:32:29+5:302021-02-09T04:32:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कौठा : वसमत तालुक्यातील ग्रामीण भागासह बहुतांश ठिकाणी सध्या रस्ते रुंदीकरण व मजबुतीकरण झाले आहे. यामुळे ...

रस्ता झाला मोठा अन् निवारा झाला छोटा
लोकमत न्यूज नेटवर्क
कौठा : वसमत तालुक्यातील ग्रामीण भागासह बहुतांश ठिकाणी सध्या रस्ते रुंदीकरण व मजबुतीकरण झाले आहे. यामुळे रस्त्याचा प्रश्न मिटला असला तरी याभागात असलेले प्रवासी निवारे मात्र अडगळीत पडले आहेत.
कौठा परिसरातील वसमत - कुरुंदा रस्त्यावरील प्रवासी निवारा, नांदेड - जिंतूर रस्त्यावरील भेंडेगाव पाठीवरील निवारा व इतर ठिकाणी असलेले निवारे हे सद्यस्थितीत कोणत्याही उपयोगाचे राहिले नसून, त्यांची अवस्था ही ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशी झाली आहे.
रस्ता रुंदीकरण व मजबुतीकरण झाल्यामुळे हे रस्ते पूर्वीपेक्षा खूप उंच झाले आहेत, त्यामुळे या रस्त्यांच्या बाजूची सर्व हॉटेल, दुकाने आणि प्रवाशांना निवाऱ्यासाठी उभारलेले निवारे एकदम खोल गेले असून, त्यांची खड्ड्यात असल्यासारखी अवस्था झालेली आहे. विशेष म्हणजे हे प्रवासी निवारे पूर्वीपासूनच प्रवाशांच्या कोणत्याही उपयोगाचे नव्हते. वसमत - कुरुंदा रस्त्यावरील निवारा तर सुरुवातीपासूनच अर्धवट अवस्थेत आहे. याचे बांधकाम पूर्ण करण्यात आलेले नाही. केवळ भिंती व छत असून, मध्ये फरशी अन् बाकी काही नसल्याचे चित्र आहे. या अर्धवट निवाऱ्यात काटेरी झुडपे वाढलेली असून, दगडमाती व मुरूम पडलेला आहे. पावसाळ्यात तर यात फक्त बकऱ्या इतर जनावरेच राहतात. तर नांदेड - जिंतूर मार्गावरील भेंडेगाव पाटीवरील निवाऱ्यात काही दिवसांपूर्वी तर एक छोटे हॉटेल सुरू करण्यात आले होते. सद्यस्थितीत या निवाऱ्याची पडझड झाली आहे. आता रस्ते मोठे झाल्यामुळे हे प्रवासी निवारे एकदम छोटे दिसत असून, मुख्य रस्त्याच्या बाजूला खड्ड्यातच दिसत आहेत. त्यामुळे या प्रवासी निवाऱ्यांचे नव्याने काम करण्याची आवश्यकता आहे.
फाेटाे नं.०१