पहिल्यांदाच वाळू लिलावातून १० कोटींचा महसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:30 IST2021-05-12T04:30:45+5:302021-05-12T04:30:45+5:30

हिंगोली : जिल्ह्यात यंदा पहिल्यांदाच मागील अनेक वर्षांनंतर वाळू लिलावातून प्रशासनाला ९.७९ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे, तर अजूनही ...

Revenue of Rs 10 crore from sand auction for the first time | पहिल्यांदाच वाळू लिलावातून १० कोटींचा महसूल

पहिल्यांदाच वाळू लिलावातून १० कोटींचा महसूल

हिंगोली : जिल्ह्यात यंदा पहिल्यांदाच मागील अनेक वर्षांनंतर वाळू लिलावातून प्रशासनाला ९.७९ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे, तर अजूनही पाचव्या फेरीत १३ घाट लिलावासाठी उपलब्ध असून याला प्रतिसाद मिळाल्यास आणखी पाच कोटी रुपयांचा महसूल जमा होण्याची अपेक्षा आहे.

मागील तीन ते चार वर्षांत कधी लिलावच रद्द होण्याचा तर कधी लिलावात एक ते दोनच घाट जाण्याचा प्रकार घडत होता. त्यामुळे वाळू उपलब्ध होत नसल्याने अनेकांचे बांधकाम ठप्प झाले होते. घर बांधायला काढलेल्या अनेकांना नाईलाजाने वाळूमाफियांकडून मिळेल त्या भावात वाळू घेण्याची वेळ आली होती. मात्र, आता वाळूच्या घाटांचे लिलाव झाल्यानंतर वाळूचे दर निम्म्यावर आल्याचे दिसून येत आहे. वाहतुकीच्या अनुषंगाने अंतरावरून २२ ते २७ हजारांपर्यंत सहा ब्रासच्या टिप्परची किंमत मोजावी लागत आहे. त्यामुळे यंदा घर बांधकामांना विविध भागात गती आल्याचे दिसत आहे. यातही काहीजण अवैध वाहतूक करून महसूल प्रशासनाला चकमा देत आपले उखळ पांढरे करून घेत आहेत, तर प्रशासन कोरोनाच्या नियोजनात जास्त व्यस्त असल्याचा फायदाही घेतला जात आहे. शिवाय महसूलची खालची यंत्रणाही या माफियांकडे ढुंकूनही पहायला तयार नाही. तलाठी, मंडळ अधिकारी कधीतरी एखादे वाहन पकडताना दिसत आहेत. फक्त पोलीस प्रशासनाने मात्र महसूलपेक्षाही धडाडीची कारवाई चालविली असून त्यांनाच मटका राजरोस सुरू असल्यापेक्षा वाळूची जास्त चिंता आहे. यामागे काय गौडबंगाल आहे, हे कळायला मार्ग नाही.

हे घाट गेले लिलावात

वसमत तालुक्यातील परळी दशरथे, माटेगाव, ब्राह्मणगाव, सावंगी बु., ढवूळगाव, औंढा तालुक्यातील माथा, आजरसोंडा, अनखळी, भगवा, नांदखेडा, कळमनुरी तालुक्यातील सापळी, कसबे धावंडा, चिखली, डोंगरगाव पूल, कोंढूर, सावंगी भु., सोडेगाव, येगाव हे घाट लिलावात गेले. यातून ९.७९ कोटींचा महसूल मिळाला आहे.

१३ घाटांचे लिलाव सुरू

आता जिल्ह्यातील हिंगणी, चाफनाथ, नांदापूर, सालेगाव, डिग्रस, ता. कोंढूर, शेवाळा, कान्हेगाव, पिंपरी बु., टाकळगव्हाण, अंजनवाडी, नालेगाव, तपोवन, पोटा बु. या घाटांच्या लिलावाची प्रक्रिया सुरू आहे. यातून ३२ हजार २०९ ब्रास वाळू जमा होणार आहे, तर ५ कोटींचा महसूल मिळण्याची अपेक्षा आहे.

Web Title: Revenue of Rs 10 crore from sand auction for the first time