वसमत : अनेक तक्रारीने प्रसिद्ध झालेले मुख्याधिकारी अशोक साबळे यांची अंबेजोगाई येथे बदली झाली आहे. तर त्यांच्या जागी आशुतोष चिंचाळकर यांची नियुक्ती झाली आहे. मुख्याधिकारी यांच्या विरोधात नगरसेवकांनी आयुक्तांकडे तक्रारी केल्या होत्या. त्या तक्रारीची चौकशी समितीच्या माध्यमातून सुरू आहे.
वसमत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी साबळे यांची नियुक्ती झाल्यापासून ते सतत या- ना- त्या कारणांने चर्चेचे कारण ठरले. नगरपालिकेत त्यांच्या गैरहजेरीने कंटाळलेल्या कार्यकर्त्यांनी रिकाम्या खुर्चीला हार घालण्याचेही प्रकार घडले होते. कोरोनाच्या काळात मुख्याधिकारी कोठे आहेत हा प्रश्न होता. स्वच्छ सर्वेक्षण, स्वच्छता अभियानातील दर्जाहीन कामे, अतिक्रमणाकडे दुर्लक्ष, कागदोपत्री खरेदी, सभागृहातील बैठकीत न झालेले ठराव व अनेक संदर्भात नगरसेवकांनी तक्रारी केल्या होत्या. या तक्रारीवरुन विभागीय आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले होते. चौकशी करण्यासाठी चार सदस्यीय चौकशी समिती स्थापन झाली असून चौकशीही सुरू आहे. चौकशी सुरू असतानाच मुख्याधिकारी साबळे यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागी औरंगाबाद मनपाचे सहाय्यक संचालक आशुतोष चिंचाळकर यांची नियुक्ती झाली आहे. २३ डिसेंबरपासून कार्यमुक्त करण्यात आले असून २४ डिसेंबर रोजी पदस्थापना दिलेल्या पदावरुन रुजू होण्याचे आदेश आहेत.
मुख्याधिकारी अशोक साबळे यांच्या बदली संदर्भात माजी नगराध्यक्ष अ. हफीज अ. रहेमान यांना विचारले असता, त्यांनी बदली झाली हे वसमतसाठी चांगलेच झाल्याचे सांगितले. तसेच बदली झाल्याने चौकशीवर परिणाम होणार नाही, चाैकशीत जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी कायम असल्याचेही त्यांनी सांगितले.