पाऊस सरकताे उतरेकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:33 IST2021-08-12T04:33:38+5:302021-08-12T04:33:38+5:30
हिंगोली : ऑगस्ट महिना तसा पाहिला तर पावसाच्या दिवसाचा आहे; परंतु वातावरणात अचानक बदल झाला असून ऑगस्ट महिन्यातील पाऊस ...

पाऊस सरकताे उतरेकडे
हिंगोली : ऑगस्ट महिना तसा पाहिला तर पावसाच्या दिवसाचा आहे; परंतु वातावरणात अचानक बदल झाला असून ऑगस्ट महिन्यातील पाऊस सद्य:स्थितीत उत्तरेकडे सरकला असून येत्या १३ ते २० ऑगस्टदरम्यान मराठवाड्यात येईल, असा अंदाज वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे हवामानशास्त्रज्ञ डॉ. कैलास डाकोरे यांनी वर्तविला आहे.
हवामानात अचानक बदल झाल्याने दमट व ढगाळ वातावरण सर्वच ठिकाणी निर्माण झाले आहे. त्यामुळे कापूस, सोयाबीन, उडीद, मूग आदी पिकांवर किडीचा प्रादुर्भाव होणे साहजिकच आहे. सध्या पावसाने उघडीप दिल्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांवर फवारणी करून घ्यावी. तसेच शेतात उगवलेल्या पिकांतील काडीकचरा काढून घ्यावा. १३ ऑगस्टपर्यंत तरी मराठवाड्यात पावसाची शक्यता तशी कमीच आहे.
ऑगस्ट महिन्यातील पाऊस हिमालयाच्या पायथ्याशी असून लवकरच तो मराठवाड्यात दाखल होण्याची शक्यता आहे. जुलै महिन्यात चांगला पाऊस पडल्याने सद्य:स्थितीत पिकांची वाढ चांगली झाली आहे. बरड्या शेतात उगवलेल्या पिकांना जास्त पावसाची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्या पिकांना विहिरीचे पाणी दिले तर अधिक उत्तम राहील.
दुसरीकडे दमट व ढगाळ वातावरणामुळे पिकांवर मावा, तुडतुडे व अळ्यांचा प्रादुर्भाव वाढला आहे. पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांनी पिकांवर फवारणी करून घेणे गरजेचे आहे. उतरेकडे सरकलेला पाऊस लवकरच मराठवाड्यात येईल. तोपर्यंत केवळ गार वारेच सुरू राहील, असे हवामान विभागाने स्पष्ट केले.