Proposal hang out at Tehsil level | तहसील स्तरावर अधिग्रहण प्रस्ताव लटकले
तहसील स्तरावर अधिग्रहण प्रस्ताव लटकले

लोकमत न्यूज नेटवर्क
सेनगाव : तालुक्यात सद्यस्थितीत भिषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ग्रा.पं.ने दाखल केलेल्या अधिग्रहण प्रस्तावांना तहसील स्तरावर मंजुरी मिळत नसल्याने ते मंजुरीच्या प्रतीक्षेत लटकत पडले आहेत. परिणामी, ग्रामस्थ टंचाईत होरपळत आहेत.
पाणीटंचाईबद्दल प्रशासन गंभीर नसल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे. सेनगाव तालुक्यात यावर्षी पाणीपातळी मोठ्या प्रमाणात खालावल्याने संपूर्ण तालुका पाणीटंचाईच्या झळा सोसत आहे. शहरासह ग्रामीण भागात भिषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाण्यासाठी ग्रामस्थ कडक उन्हाळ्यात भंटकती करीत असताना या टंचाईबद्दल प्रशासन गांभीर्याने दखल घेत नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. तालुक्यातील ५५ गावांत सद्यस्थितीत भिषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. शासकीय जलसाठे आटले असून नळयोजना बंद पडल्याने या ५५ ग्रामपंचायतींचे अधिग्रहणाचे ९० प्रस्ताव जानेवारीमध्ये पं.स.कडे दाखल झालेले आहेत. त्यापैकी १२ प्रस्ताव त्रुटीमध्ये निघाले असून उर्वरित ७८ प्रस्ताव स्थळपाहणी करुन मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहेत. परंतु तहसील स्तरावर या अधिग्रहण प्रस्तावांना मंजुरी दिली जात नाही. जानेवारी महिन्यापासून टप्प्या-टप्प्याने पंचायत समितीकडून प्राप्त प्रस्ताव तहसील स्तरावर मंजुरीच्या प्रतीक्षेत प्रलंबित आहते. आजपर्यंत एकाही अधिग्रणाचा मंजुरी आदेश पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाला प्राप्त झाला नसून विनामंजुरी अधिग्रहणधारकांचा ग्रामीण भागात पाणीपुरवठा चालू आहे. त्यामुळे गंभीर दुष्काळात पाणीपुरवठ्यासाठी अधिग्रहणधारक अधिग्रहण मंजुरीच्या आदेशाकरिता तहसील कार्यालयात खेटे मारीत आहेत.
मागील तीन महिन्यांपासून पाणीपुरवठा करणाऱ्या अधिग्रहणधारकांना तहसील प्रशासन कोणत्या दिनांकापासून मंजुरी आदेश देते यावर अधिग्रहणधारकांना शासनाकडून मोबदला मिळणार आहे. त्यामुळे वेळेत अधिग्रहण मंजुरीचे आदेश दिले नसल्याने अधिग्रहण मोबदल्याचा गोंधळ या विलंबाने निर्माण होणार आहे. या प्रकारासंबंधी तहसीलदार जिवकुमार कांबळे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, काही अधिग्रहण प्रस्तावांना मंजुरी दिली असून मंजुरी देण्याचे काम चालू आहे. लवकरच सर्व प्रस्तावांना मंजुरी देऊ, असे त्यांनी सांगितले.


Web Title:  Proposal hang out at Tehsil level
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.