टप्पा अनुदानाचे ८७ शाळांचे प्रस्ताव सादर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:28 IST2021-03-25T04:28:06+5:302021-03-25T04:28:06+5:30
हिंगोली जिल्ह्यातील माध्यमिकच्या २० टक्क्यांहून ४० टक्के अनुदानासाठी २० शाळा पात्र ठरल्या आहेत. तर मूळ वर्ग व तुकड्यांवरील २६ ...

टप्पा अनुदानाचे ८७ शाळांचे प्रस्ताव सादर
हिंगोली जिल्ह्यातील माध्यमिकच्या २० टक्क्यांहून ४० टक्के अनुदानासाठी २० शाळा पात्र ठरल्या आहेत. तर मूळ वर्ग व तुकड्यांवरील २६ शाळा आहेत. या शाळांचे प्रस्ताव आता ४० टक्क्यांसाठी सादर होणार असल्याने संस्था प्रशासनाची एकच लगबग दिसत होती. तर नवीन ४ पैकी ३ शाळांना २० टक्के अनुदानाचा लाभ मिळणार आहे. याशिवाय कनिष्ठ महाविद्यालयांचेही घोषितचे ४१ शाळांचे २० टक्क्यांचे प्रस्तावही आज सादर करण्यात आले आहेत.
शासनाने अचानकच एका दिवसात हे प्रस्ताव सादर करण्यास सांगितल्याने शाळा प्रशासनाची दमछाक उडाल्याचे दिसून येत होते. यासाठी आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यात संस्थाचालक, मुख्याध्यापक मंडळी हैराण होती. काहींचे मात्र अद्ययावत प्रस्ताव तयार असल्याने अशांची डोकेदुखी वाचली. इतर अनेकांना एकेका कागदासाठी वारंवार संस्थेकडे चकरा मारण्याची वेळ येत होती, यामुळे माध्यमिक शिक्षण विभागात एकच गर्दी झाल्याचे पहायला मिळाले.
वाढीव टप्पा अनुदानाचा शाळांचा गेल्या अनेक दिवसांचा प्रश्न आहे. यासाठी संस्थांपेक्षा शिक्षकांतून मोठी ओरड होत होती; मात्र यावर्षी शासनाने त्याला मुहूर्त काढला असल्याने २० टक्के पगार असलेल्यांना थेट दुप्पट पगार मिळणार आहे. तर ज्यांना वेतनच नाही, अशांना २० टक्के पगार सुरू होणार आहे. यंदाच्या मार्च एण्डला या शिक्षकांना ही गोड बातमी मिळाल्याने शिक्षकांच्या चेहऱ्यावरही आनंद पहायला मिळत होता. यासाठी शिक्षणाधिकारी पी.बी. पावसे, उपशिक्षणाधिकारी ए.आर. मलदांडे, कर्मचारी राजेश कोंडावार, एस.जी. वडकुते व इतर कर्मचारी परिश्रम घेत असल्याचे दिसून येत होते.