पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बनला गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:24 IST2020-12-25T04:24:11+5:302020-12-25T04:24:11+5:30
तुरीच्या शेंगा गळाल्या बासंबा : हिंगोली तालुक्यातील बासंबा शेतशिवारातील तुरीच्या पिकाने शेंगा धरल्या आहेत; पण बदलल्या वातावरणाचा परिणाम या ...

पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बनला गंभीर
तुरीच्या शेंगा गळाल्या
बासंबा : हिंगोली तालुक्यातील बासंबा शेतशिवारातील तुरीच्या पिकाने शेंगा धरल्या आहेत; पण बदलल्या वातावरणाचा परिणाम या पिकावर होत आहे. कधी ढगाळ तर कधी ऊन याप्रमाणे होणाऱ्या वातावरणाच्या बदलामुळे तुरीच्या पिकाच्या शेंगा गळून पडत आहेत. काही दिवसांपूर्वीच या भागातील तुरीचे पीक उधळले गेले होते; पण या संकटातून कसेबसे बाहेर निघल्यानंतर याच पिकाला आता बदलत्या वातावरणाने ग्रासले आहे. अचानक तुरीच्या पिकाच्या शेंगा गळून पडत आहेत. यामुळे गावातील शेतकरी संकटात सापडला आहे. वारंवार तुरीवर येणाऱ्या संकटामुळे या पिकामध्ये मोठा उतार येणार आहे.
नाल्या तुंबल्याने घाणीचे साम्राज्य
घोटा देवी : हिंगोली तालुक्यातील घोटा देवी गावातील नाल्या तुंबलेल्या अवस्थेत आहेत. यामुळे गावात घाण पसरत आहे. बऱ्याच नालीतील पाणी गावातील रस्त्यावर येऊन जमा होत असल्याने गावामध्ये दुर्गंधी पसरत आहे, तसेच रस्त्यावर साचणाऱ्या घाण पाण्यात डासांची उत्पत्ती होत असल्याने याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होऊ लागला आहे. यासाठी गावातील तुंबलेल्या नाल्यांची साफसफाई करण्यात यावी, अशी मागणी गावातून होत आहे.
वरूड चक्रपान- भानखेडा रस्ता उखडला
वरूड चक्रपान : सेनगाव तालुक्यातील वरूड चक्रपान येथून भानखेडा गावाकडे जाणारा मुख्य रस्ता उखडला आहे. या रस्त्याची दुरवस्था वर्षभरापासून झाली आहे. या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही गावांतील नागरिकांची दोन्ही गावांत नेहमी ये-जा सुरूच असते; पण रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे हा रस्ता दुरवस्थेत सापडला आहे. वरूड चक्रपान - भानखेडा हा पाच कि.मी.चा रस्ता आहे. या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी दोन्ही गावांतील ग्रामस्थ करीत आहेत.
वन्य प्राण्यांकडून पिकाचे नुकसान
भानखेडा : सेनगाव तालुक्यातील भानखेडा गावातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये गहू, हरभरा व ज्वारीची लागवड मोठ्या प्रमाणावर केली आहे. सध्या या सर्व पिकांची वाढ चांगल्या प्रमाणात झाली आहे; पण या शेतशिवारात रात्री व सकाळच्या सुमारास रानडुक्कर, रोही, हरिण तसेच वानर घुसून पिकांचे मोठे नुकसान करीत आहे. मागील १५ दिवसांपासून या वन्यप्राण्यांकडून शेतातील पिकांचे नुकसान करण्याचे सत्र सुरू केले आहे. अनेकदा शेतकऱ्यांना आपल्या पिकाचे राखण करताना रात्री शेतात जागरण करावे लागत आहे. यासाठी संबंधित विभागाने लक्ष देऊन या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी गावकरी करीत आहेत.
बससेवा सुरू करण्याची मागणी
पांगरा शिंदे : मागील २० वर्षांपासून सुरू असलेली कळमनुरी येथील डेपोतील गावात येणारी बससेवा अचानक बंद झाल्याने गावकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. गावासह परिसरातील राजवाडी, सिरळी, खांबाळा, खापरखेडा, कुपटी, वापटी, बोल्डा, येहळेगाव तु., वाई यासह इतर काही गावांतील लोक नेहमी बाळापूर व कळमनुरी याठिकाणी जात असतात. त्यामुळे याठिकाणी कळमनुरी येथून सुरू असलेल्या बससेवेचा मोठा फायदा या गावकऱ्यांना होत असे. विशेष म्हणजे परिसरातील गावांतील प्रवासीवर्गही या बससाठी मोठ्या प्रमाणात असल्याने या बसला आर्थिक फायदाही होत होता; पण ही बससेवा बंद झाल्याने गावातील वयोवृद्धांसह इतर प्रवासीवर्गाला खाजगी वाहनातून जास्त पैसे देऊन प्रवास करावा लागत आहे.