गरोदर महिलांनाही आता घेता येणार कोरोना प्रतिबंधक लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:36 IST2021-07-07T04:36:37+5:302021-07-07T04:36:37+5:30

हिंगोली : आता लसीकरणाबाबत निर्माण झालेल्या जागरुकतेमुळे पुन्हा लसीकरणाचा वेग वाढला आहे. यामुळे पुन्हा रांगा लागत असल्याचे दिसत आहे. ...

Pregnant women can now also get the corona vaccine | गरोदर महिलांनाही आता घेता येणार कोरोना प्रतिबंधक लस

गरोदर महिलांनाही आता घेता येणार कोरोना प्रतिबंधक लस

हिंगोली : आता लसीकरणाबाबत निर्माण झालेल्या जागरुकतेमुळे पुन्हा लसीकरणाचा वेग वाढला आहे. यामुळे पुन्हा रांगा लागत असल्याचे दिसत आहे. गरोदर मातांनाही कमी रोगप्रतिकारक शक्तीमुळे कोरोनाचा असलेला जास्तीचा धोका लक्षात घेता त्यांनाही आता ही लस घेता येणार आहे.

कोरोना लसीकरणात सुरुवातीला गरोदर मातांनी ही लस घ्यावी की नाही, यावरून संभ्रमावस्था होती. मात्र, आता यावर मार्गदर्शक सूचना जारी झाल्या आहेत. त्यानुसार या मातांचे आरोग्यविषयक सर्व अहवाल चांगले असतील, कोणतेही गंभीर आजार नसतील तर त्यांनी ही लस घेणे सुरक्षित आहे. शिवाय यामुळे त्यांना कोरोनातून सुरक्षितताही मिळणार आहे. त्यामुळे गरोदर मातांनीही ही लस घेण्याचे आवाहन करण्यात आले. दरवर्षी २० ते २२ हजार महिलांचे बाळंतपण खासगी व शासकीय रुग्णालयांमध्ये होत असते. त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येतील महिलांपैकी ज्यांना शक्य आहे, अशा अनेकींना लसीकरणाचा लाभ घेता येणार आहे.

गरोदर महिलांनी लस घेण्यापूर्वी ही काळजी घ्यावी

प्रत्येक गरोदर महिलेने गरोदरपणाची नोंद शासकीय संस्थेत करणे गरजेचे आहे. त्यामुळे अशांना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यासाठी प्रयत्न करणे शक्य होणार आहे.

गरोदर मातांनी रक्त, लघवी व सोनोग्राफी आदींची नियमित तपासणी केलेली असावी. तसेच गरोदरपणात लोह, कॅल्शियम गोळ्या, धनुर्वात इंजेक्शन घेऊन स्त्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला घेतलेला असणे आवश्यक आहे.

जोखीम असलेल्या गरोदर माता ज्यात उच्च रक्तदाब, मधुमेह, तीव्र रक्तक्षय व इतर गंभीर आजार असल्यास स्त्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच लसीकरणाबाबत निर्णय घ्यावा. याबाबतची माहिती लसीकरण केंद्रावरही लपवू नये, जेणेकरून पुढे अडचण निर्माण होणार नाही.

आतापर्यंतचे लसीकरण २२१८५० लसीकरणाची टक्केवारी ३.७ टक्के

पुरुष

पहिला डोस ११९५३४

दुसरा डोस २१५३८

महिला

पहिला डोस १०२२८५

दुसरा डोस १६३२०

गरोदर मातांनाही लस घेता येणार आहे. यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना आल्या आहेत. स्त्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला घेऊन लस घेतल्यास दुहेरी सुरक्षा मिळणार आहे.

- डॉ. सचिन भायेकर, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी

गरोदर मातांनीही कोरोना प्रतिबंधक लस घेणे सुरक्षित आहे. सर्व तपासण्याअंती स्त्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला घेऊन लस् घेणे अधिकचे सोयीस्कर ठरेल.

- डॉ. उमा सोनी, स्त्रीरोग तज्ज्ञ

Web Title: Pregnant women can now also get the corona vaccine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.