ट्रॅक्टरच्या सहाय्याने तूर काढणीला प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:53 IST2021-02-05T07:53:48+5:302021-02-05T07:53:48+5:30

ट्रॅक्टरच्या सहायाने तूर काढणीला प्राधान्य हिंगाेली : कळमनुरी तालुक्यात तूर काढणी अंतिम टप्प्यात आली आहे. मजुरांच्या सहायाने तूर कापणी ...

Preference is given to tractor harvesting | ट्रॅक्टरच्या सहाय्याने तूर काढणीला प्राधान्य

ट्रॅक्टरच्या सहाय्याने तूर काढणीला प्राधान्य

ट्रॅक्टरच्या सहायाने तूर काढणीला प्राधान्य

हिंगाेली : कळमनुरी तालुक्यात तूर काढणी अंतिम टप्प्यात आली आहे. मजुरांच्या सहायाने तूर कापणी केल्यानंतर मजुरांच्या सहायाने तूर बडविण्याऐवजी ट्रॅक्टरच्या सहायाने तूर काढली जात आहे. सध्या ट्रॅक्टर चालकांना अच्छे दिन आल्याचे पहावयास मिळत आहे.

पुलाचे कठडे गायब

कळमनुरी : हिंगा्ेली ते नांदेड मार्गावरील साळवा परिसरातील मेळाचा पूल म्हणून ओळखला जात असलेल्या पुलाचे कठडे गायब झाले आहेत. ऐन वळणावर पुल असल्याने वाहनचालकांसाठी धोका निर्माण होत आहे. कठडे नसल्याने दोन दिवसांपूर्वीच पुलावरून एक जीप खाली कोसळल्याची घटना घडली होती. सुदैवाने यात कोणी जखमी झाले नव्हते. या पुलाचे कठडे बसवावेत, अशी मागणी केली जात आहे.

रस्त्यावर बांधकाम साहित्य

हिंगोली : शहरातील काही भागात नागरिक घराचे बांधकाम करीत आहेत. बांधकाम करीत असताना बांधकाम साहित्य अनेक दिवस रस्त्यावर पडून राहत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. काही नागरिकांना गिट्टी मिळाली तर वाळू मिळत नसल्याचे चित्र आहे. वाळू अभावी बांधकाम थांबविले जात असले तरी यासाठी आणलेली गिट्टी मात्र अनेक दिवस पडून राहत आहे.

बोअर घेण्याची लागली स्पर्धा

हिंगोली : जिल्हाभरातील शेतकरी सिंचनाकडे वळले आहेत. विहीर, बंधारा, तलावातील पाणी पिकांना दिले जात आहे. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सुविधा उपलब्ध नाही, असे शेतकरी शेतात बोअर घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. ग्रामीण भागात आता बोअर घेण्याची स्पर्धा लागत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

रेल्वे फाटकाजवळ वाहतुकीचा खोळंबा

हिंगोली : शहरातून सकाळी ११ वाजेच्या सुमारास रेल्वे जाते. यावेळी रेल्वेगेट जवळील फाटक लावले जाते. रेल्वे गेल्यानंतर दोन्ही बाजूनी थांबलेली वाहने एकाच वेळी जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे दोन्ही दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प पडत आहे. वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करताना पोलीस कर्मचाऱ्यांच्या नाकीनऊ येत आहे.

बसस्थानकाला बसची प्रतीक्षा

वारंगा फाटा: कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा येथे लाखो रूपये खर्च करून बसस्थानक उभारण्यात आले आहे. मात्र कोरोनाच्या काळात बसेस बंद करण्यात आल्याने येथे बस येण्याचे प्रमाण कमी झाले होते. आता बस वाहतूक सुरू झाली असली तरी अनेक बस बसस्थानकात न जाता महामार्गावरच थांबत आहेत. त्यामुळे प्रवाशांना गैरसायीला सामोरे जावे लागत आहे.

रस्त्यावर अस्ताव्यस्त वाहने

हिंगोली : शहरातील बसस्थानक, गांधी चौक आदी भागात वाहने उभी करण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेक तास एकाच जागेवर वाहने उभी राहत असल्याने इतर वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. एकाव जागेवर अनेक तास वाहने उभी करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.

कचरा टाकण्याचे प्रमाण वाढले

हिंगोली : शहराजवळून कयाधू नदी वाहते. सध्या नदीत पुरेसे पाणी वाहत नसले तरी पावसाळ्यात नदी दुथडी भरून वाहते. शहरातील काही व्यापारी दुकानातील कचरा कयाधू नदीशेजारी टाकत असल्याचे चित्र आहे. पावसाळ्यात हाच कचरा नदीतील पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत जात आहे. यातून प्रदुषण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

पायऱ्यांचे कोपरे रंगले पिचकारींनी

हिंगाेली : येथील जिल्हा परिषद इमारतीच्या पायऱ्यावरील कोपऱ्यावर गुटखा खाऊन थुंकणाऱ्याचे प्रमाण वाढले आहे. जिल्ह्याला स्चछतेचे महत्व पटवून सांगणाऱ्या जिल्हा परिषदेच्या इमारतीतच अस्वच्छता पसरत असल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे. गुटखा खाऊन थुंकणाऱ्या कर्मचारी, नागरिकांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

सोशल डिस्टन्सचा फज्जा

हिंगोली : जिल्हा भरात कोरोनाबाधीतांची संख्या घटली असली तरी कोरोनाचे संकट कायम आहे. शासन सोशल डिस्टन्स पाळण्याचे आवाहन करीत आहे. मात्र नागरिक बाजारपेठेत गर्दी करीत आहेत. दुकानांमध्येही असेच चित्र पहावयास मिळत आहे. रस्त्यांवरही गर्दी कायम असून रस्ते नागरिकांच्या गर्दीने फुललेले दिसून येत असल्याचे चित्र आहे.

आतापर्यंत ३ हजार ७१९ कोरोनाबाधीत रूग्णसंख्या

हिंगोंली : जिल्हाभरात कोरोनाबाधीत रूग्णांची संख्या काहीशी मंदावली असली तरी आतापर्यंत ३ हजार ७१९ कोरोनाबाधीत रूग्ण आढळून आले आहेत. जिल्हा रूग्णालयासह, कळमनुरी, वसमत येथील रूग्णालयात रूग्णांवर उपचार केले जात आहेत. हात स्वच्छ धुणे, तोंडाला मास्क लावणे यासह इतर कोरोनाबाबतचे नियम सर्वांनी पाळावे, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

हरभरा उत्पादन वाढीची अपेक्षा

हिंगोली : जिल्हाभरात यावर्षी समाधानकारक पाऊस झाला आहे. जमीनीत ओलावा असल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी गव्हासोबत हरभरा पीकही घेतले आहे. कोरवाडवाहून शेतकऱ्यांनी तर हरभरा पिकाला पसंती दिली आहे. सध्या हरभरा पीक चांगलेच बहरलेले दिसून येत असून उत्पादनात वाढ होण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना लागली आहे.

वाळू उपसा वाढला

हिंगोली : जिल्हाभरात जानेवारी महिना ग्रामपंचायत निवडणुकीने गाजला. निवडणुकीची धामधूम असल्याने कर्मचारी, अधिकारी निवडणुकीत व्यस्त होते. या संधीचा फायदा घेत वाळू माफीयांनी अवैध वाळू उपसा करून लाखो रूपयांची कमाई केली आहे. आताही अनेक ठिकाणी वाळू माफिया वाळू उपसा करीत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

धोकादायक पद्धतीने वाहने चालविण्याचे प्रमाण वाढले

हिंगाेली : शहरात दुचाकीवाहने मोठ्या प्रमाणात रस्त्यावर धावताना दिसून येत आहेत. पुढे जाण्याच्या नादात अनेक दुचाकीचालक गतीने वाहने चालवित असून धोकादायकपद्धतीने वाहने चालवित असल्याचे चित्र आहे. यामुळे इतर वाहनचालकांना धोका निर्माण होत असून धोकादायक पद्धतीने वाहने चालविणाऱ्या चालकांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

Web Title: Preference is given to tractor harvesting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.