रस्त्यावर खड्डे; वाहनचालक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:22 IST2020-12-27T04:22:05+5:302020-12-27T04:22:05+5:30
रेल्वे पुलावर दुभाजक बसविण्याची मागणी हिंगोली: शहरातील वाशिमरोडवर असलेल्या रेल्वे पुलावर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या ठिकाणावरुन ...

रस्त्यावर खड्डे; वाहनचालक त्रस्त
रेल्वे पुलावर दुभाजक बसविण्याची मागणी
हिंगोली: शहरातील वाशिमरोडवर असलेल्या रेल्वे पुलावर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या ठिकाणावरुन वाहने वेगाने चालविली जात आहेत. वाहनांची संख्या लक्षात घेता संबंधित विभागाने या ठिकाणी रस्त्याच्या मधोमध दुभाजक बसवून अपघात टाळावेत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
कायमस्वरुपी पोलीस नेमावा
हिंगोली: शहरातील गांधी चौक, इंदिरा चौक हा भाग अत्यंत वर्दळीचा आहे. वाहनांची संख्याही या ठिकाणी वाढली आहे. परंतु, काही वाहनचालक वाहने अस्ताव्यस्तपणे लावत आहेत. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. या ठिकाणी शहरासह ग्रामीण भागातील नागरिक बाजार करण्यासाठी येतात. तेव्हा संबंधित विभागाने याची दखल घेऊन कायमस्वरुपी वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांतून होत आहे.
भाजीपाला पिकात पाणी व्यवस्थापन करावे
हिंगोली: रब्बी हंगामातील भाजीपाला पीक वाढीच्या अवस्थेत आहे. रब्बी हंगामात लागवड केलेल्या भाजीपाला पिकात पाणी व्यवस्थापन करावे. कांदा पिकात करपा रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी डायफेन्कोनॅझोल २५ ईसी १० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, असा सल्ला ‘वनामकृ’ विद्यापीठाच्या कृषी शास्त्रज्ञांनी दिला आहे.
वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी
आखाडा बाळापूर: कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर व परिसरातील अनेक गावांमध्ये वीज खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे विहिरींना पाणी असूनही पिकांना देता येत नाही. परिणामी पिके वाळून जात आहेत. महावितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या बाबीची दखल घेऊन ग्रामीण भागातील वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे
बसस्थानकात धुळीचे प्रमाण वाढले
हिंगोली: मागील काही दिवसांपासून बसस्थानकात धुळीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे प्रवाशांना अतोनात त्रास होत आहे. महामंडळाच्या संबंधित विभागाने याची दखल घेऊन सकाळ-सायंकाळ बसस्थानकात पाणी टाकून धूळ कमी करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
शहरात वानरांची संख्या वाढली
हिंगोली: गत काही दिवसांपासून अन्न व पाण्याच्या शोधात वानरे शहरात दाखल झाले आहेत. घरावरील कौलावरुन उड्या मारत अंगणात ठेवलेल्या वस्तुंची नासाडी करीत आहेत. नागरिकांनी हुसकावण्याचा प्रयत्न केला तर अंगावर धावून येत आहेत. वन विभागाने सापळा रचून वानरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.