हिंगोली : नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात कार्यकर्त्यांच्या या पक्षातून त्या पक्षात उड्या सुरू आहेत. दुसरीकडे आघाडी, युतीच्या गुणधर्माला छेद दिला जात आहे. त्यामुळे कुठे आघाडी, तर कुठे बिघाडी असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात हिंगोली, कळमनुरी आणि वसमत या तीन नगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे राजकारण तापले आहे. सोयीच्या पक्षाचा शोध घेत कार्यकर्ते या पक्षातून त्या पक्षात उड्या घेत आहेत. त्यामुळे कोण आधी कोणत्या पक्षात होता आणि आता कोणत्या पक्षात आहे, याचा अंदाज घेत मतदार निवडणुकीला सामोरे जात आहेत.
नगरपालिका निवडणूक जाहीर होण्याच्या काही दिवसांपूर्वीच हिंगोलीतील काँग्रेसचे माजी आमदार भाऊराव पाटील यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिंदेसेनेत प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्यासह काही माजी नगरसेवकांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. याशिवाय दररोज पक्ष प्रवेशाचे सोहळे रंगत आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढायच्या, की आघाडी, युती करून याविषयी वरिष्ठ पातळीवर ठोस निर्णय झाला नाही. पण जिल्ह्यात काही अपवाद वगळता सगळ्यांनीच स्वतंत्रची तयारी केली आहे. त्यामुळे कुठे आघाडी, तर कुठे बिघाडी असे चित्र आहे तर काही ठिकाणी मित्रपक्षाच्या विरोधातच शड्डू ठोकला आहे. ही अशी परिस्थिती जवळपास सगळ्याच पालिकेत आहे. पालिकेची सत्ता ताब्यात घेण्यासाठी चढाओढ सुरू आहे. एकंदर राजकारण तापले असून, तिन्ही पालिकांच्या निवडणुका बहुरंगी होतील, असे सध्याच्या परिस्थितीवरून दिसत आहे.
हिंगोलीत मित्रपक्ष आमने-सामनेहिंगोली नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि शिंदेसेना हे राज्यातील मित्रपक्ष एकमेकांच्या विरोधात आहेत. दोन्ही बाजूने जोरदार तयारी सुरू आहे. अजित पवारांची राष्ट्रवादी हा तिसरा मित्रपक्षदेखील मैदानात उतरणार आहे. महाविकास आघाडीकडून काँग्रेसनेदेखील बैठका लावून येथील निवडणुकीसाठी आखणी केली आहे.
वसमतमध्ये वेगळेच संकेतराष्ट्रवादी अजित पवार गटाने आमदार राजू नवघरे यांच्या नेतृत्वाखाली वसमत येथील नगरपालिका स्वतंत्र लढण्याची तयारी केली आहे. त्यांच्या विरोधात माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी आघाडीतील घटक पक्षांना सोबत घेऊन महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. या दोघांनाही शह देण्यासाठी शिवसेना शिंदे गट आणि भाजप युती करण्याच्या हालचाली होत आहेत. असे झाले तर निवडणुकीत आणखी चुरस वाढणार आहे.
महाविकास आघाडीची मोटस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी करून लढण्यासाठी माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी सर्व घटक पक्षांची बैठक घेऊन एकत्रीकरण केले. शिवसेना उबाठा, काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार या तिन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठकही झाली. त्यामुळे महाविकास आघाडी कसा प्रभाव दाखवते, याचीही उत्सुकता आहे.
Web Summary : Hingoli's municipal elections see shifting alliances as parties prepare independently. Congress, NCP factions, and Shiv Sena compete, creating multi-cornered contests. Alliances are fluid, with potential for surprises in Hingoli, Vasmat, and Kalamnuri, making the elections highly competitive.
Web Summary : हिंगोली नगरपालिका चुनावों में पार्टियां स्वतंत्र रूप से तैयारी कर रही हैं जिससे गठबंधन बदल रहे हैं। कांग्रेस, एनसीपी गुट और शिवसेना प्रतिस्पर्धा कर रहे हैं, जिससे बहुकोणीय मुकाबले हो रहे हैं। गठबंधन अस्थिर हैं, हिंगोली, वसमत और कलमनुरी में आश्चर्य की संभावना है, जिससे चुनाव अत्यधिक प्रतिस्पर्धी हो गए हैं।