गावशिवेच्या वादात अडविले शेततळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 12:38 AM2018-05-21T00:38:54+5:302018-05-21T00:38:54+5:30

पाणी फाऊंडेशनच्या वॉटरकप स्पर्धेतील कामांच्या अखेरच्या टप्प्यात भुरक्याची वाडी येथे अपशकुन झाला आहे. गायरानात सुरू असलेल्या शेततळ्याचे काम बऊरच्या ग्रामस्थांनी रोखले असून ती जमीन आमच्या मालकीची असल्याचा दावा केला आहे. तहसीलदारांनी भेट देवून ती जमीन भुरक्याची वाडीचे गायरान असल्याचे लेखी आदेश दिले. त्यानंतरही काम रोखल्याने १५० ग्रामस्थांनी बाळापूर पोलीस ठाण्यात दाद मागितली. घटनास्थळी जावून ठाणेदारांनी समजूतही काढली पण त्याचा काही उपयोग झाला नाही.

 Planting villages in the conflict between villages | गावशिवेच्या वादात अडविले शेततळे

गावशिवेच्या वादात अडविले शेततळे

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
आखाडा बाळापूर : पाणी फाऊंडेशनच्या वॉटरकप स्पर्धेतील कामांच्या अखेरच्या टप्प्यात भुरक्याची वाडी येथे अपशकुन झाला आहे. गायरानात सुरू असलेल्या शेततळ्याचे काम बऊरच्या ग्रामस्थांनी रोखले असून ती जमीन आमच्या मालकीची असल्याचा दावा केला आहे. तहसीलदारांनी भेट देवून ती जमीन भुरक्याची वाडीचे गायरान असल्याचे लेखी आदेश दिले. त्यानंतरही काम रोखल्याने १५० ग्रामस्थांनी बाळापूर पोलीस ठाण्यात दाद मागितली.
घटनास्थळी जावून ठाणेदारांनी समजूतही काढली पण त्याचा काही उपयोग झाला नाही.
कळमनुरी तालुक्यातील भुरक्याची वाडी हे गाव पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभागी असलेल्या गावात अग्रणी आहे. गावात भरपूर कामे झाली. अखेरच्या टप्प्यात गावातील गायरानात शेततळे खोदण्याचे काम मशिनद्वारे सुरू आहे; परंतु तळ्याचे काम सुरू असलेली जमीन आमच्या मालकीची असल्याचा दावा करीत बऊरच्या काही मंडळींनी हे काम रोखले. काम अडविल्याने भुरक्याच्या वाडीच्या ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे तक्रार अर्ज देत प्रश्न सोडविण्याची विनंती केली. तहसीलदार डॉ. प्रतिभा गोरे, एमआरईजीएसच्या वर्षा स्वामी यांनी १७ मे रोजी स्थळ पाहणी केली. त्यानंतर भुरक्याच्या वाडीचा गट क्र. ७५ गायरान असून सध्या सुरू असलेले काम गायरानातच असल्याचे स्पष्टपणे सांगितले. बऊरच्या गट क्र. ३६ धारकास काही अडचण असल्यास त्यांनी त्यांचे शेत मोजून घ्यावे, असे लेखी कळविले. त्यानंतरही सदर काम अडविण्यात आले. त्यामुळे २० मे रोजी दुपारी १ वाजता भुरक्याच्या वाडीतील १५० ग्रामस्थांनी पोलीस ठाणे गाठले व दाद मागितली.
बऊरच्या संबंधितांविरूद्ध ठाण्यात लेखी तक्रारही दिली. पोनि व्ही.एम. केंद्रे यांनी घटनास्थळी जावून समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु मोजणी करून ‘शिव’ निश्चिती करा, असा आग्रह धरल्याने अखेरच्या टप्प्यात पाणी फाऊंडेशनच्या कामाला खीळ बसली. तालुक्यात सुरू असलेल्या कामात ‘शिवे’च्या वादावरून काम बंद करण्याची ही पहिलीच घटना आहे.
भुरक्याच्या वाडीचेच ते गायरान असल्याने लेखी तहसीलदारांनी स्पष्ट केल्यानंतरही तुम्ही जमीन मोजून घ्या व हद्द निश्चित झाल्यानंतरच काम करा, असा हट्ट धरल्याने आम्ही २०० ते २५० ग्रामस्थ तहसीलदारांकडे जावून तातडीने मोजणी करून हद्द निश्चित करून द्यावी, अशी मागणी करणार असल्याचे सरपंच संतोष भुरके यांनी सांगितले.

Web Title:  Planting villages in the conflict between villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.