योजनेचे अर्ज घेण्यासाठी वसमतकरांच्या उड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 00:12 IST2017-12-19T00:12:19+5:302017-12-19T00:12:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वसमत : शहरात नगरपालिकेच्या माध्यमातून बेघरांना घरे बांधून देण्यासाठीची पंतप्रधान आवास योजना राबवली जाणार आहे. या ...

योजनेचे अर्ज घेण्यासाठी वसमतकरांच्या उड्या
लोकमत न्यूज नेटवर्क
वसमत : शहरात नगरपालिकेच्या माध्यमातून बेघरांना घरे बांधून देण्यासाठीची पंतप्रधान आवास योजना राबवली जाणार आहे. या योजनेचे टेंडर सुटले व गुत्तेदाराने शहरात सर्व्हे सुरू केल्याचे वृत्त समजताच योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी नगरपालिकेत प्रचंड गर्दी केली आहे. योजनेची माहिती नागरिकांना नसल्याने नागरिक थेट नगरपालिकेत धाव घेत आहेत.
पंतप्रधान आवास योजना वसमत शहरात राबवली जाणार आहे. योजनेचा ‘डिपीआर’ तयार करण्याच्या कामाला ‘सर्वानुमते’ मंजुरी मिळाल्यापासून गुत्तेदाराने काम सुरू केले आहे. या योजनेत योजनेची प्रसिद्धी, माहिती देण्याचे काम एजन्सीने करावयाचे आहे. मात्र अद्याप शहरात योजनेचे साधे पत्रकही नागरिकांना पहावयास मिळालेले नाही. लाभार्थ्यांची घरोघर जावून प्रत्यक्ष पाहणी करून निवड करावयाची आहे. मात्र ते कामही सुरू नाही. त्यामुळे प्रधानमंत्री आवास योजनेचे घरकुल मिळणार एवढीच माहिती नागरिकांना झाली व थेट नगरपालिकेत गर्दी वाढली.
योजनेचे फॉर्म लाभार्थ्यांना घरपोहोच देवून लाभार्थी निवड करावयाची असताना नागरिकांना कोणतीच माहिती न देता नगरपालिकेत येण्यास भाग पाडण्याचा हा अजब प्रकार आहे. योजनेचा डीपीआरच तयार होवून शासनाकडे गेलेला नसल्याचे समजते. अशा परिस्थितीत लाभार्थ्यांची निवड कोण्या पद्धतीने होणार? हाच खरा प्रश्न आहे. वसमत शहरात राबवली जाणारी पंतप्रधान आवास योजना ही चांगली व गोरगरीबांसाठीची महत्वाची योजना आहे.
या योजनेचा लाभ लाभार्थ्यांना योग्य रितीने व्हावा, यासाठी योजनेचा प्रचार प्रसारावर भर देण्याची मागणी होत आहे.