चोंढी शहापुरात तणावानंतर शांतता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 00:35 IST2018-02-03T00:35:35+5:302018-02-03T00:35:46+5:30
तालुक्यातील चोंढी शहापूर येथे महापुरुषाच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे उघडकीस आल्यानंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीस प्रशासनाने या घटनेची वेळीच गंभीर दखल घेतल्याने गावात शांतता प्रस्थापित करण्यात यश आले आहे. याबाबत गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

चोंढी शहापुरात तणावानंतर शांतता
लोकमत न्यूज नेटवर्क
औंढा नागनाथ : तालुक्यातील चोंढी शहापूर येथे महापुरुषाच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे उघडकीस आल्यानंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीस प्रशासनाने या घटनेची वेळीच गंभीर दखल घेतल्याने गावात शांतता प्रस्थापित करण्यात यश आले आहे. याबाबत गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
चोंडी शहापूर येथील दलितवस्तीमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा आहे. या पुतळ्याची विटंबना केल्याची बाब शुक्रवारी उघडकीस आली. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, हट्टा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, एपीआय नाईक, जमादार शेख खुद्दूस यांनी धाव घेतली. लगेचच उपविभागीय पोलीस शशिकिरण काशिद, एलसीबीचे मारोती थोरात, औंढ्याचे पोनि कुंदनकुमार वाघमारे, वसमतचे एपीआय जाधव, आदींनी घटनास्थळी पंचनामा करून आरोपींचा शोध घेण्यासाठी श्वान पथकासही पाचारण केले. परंतु श्वान राष्टÑीय महामार्गापर्यंतच धावले. यावेळी गावात मोठ्या संख्येने समाज संघटीत झाला होता. तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांनी समयसूचकता दाखवत आरोपींवर कठोर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. काशिद यांनी आरोपींना पकडण्याचे आश्वासन देवून गावात शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन केले. उपस्थित समाजबांधवांनी पोलिसांना दिलेल्या आश्वासनानंतर पुतळा शुद्धीकरण करीत धर्मवंदना देण्यात आली. या प्रकरणात हट्टा पोलीस ठाण्यात संशयित गोरखनाथ गंगाराम काळे व संतोष गणपत कबले या दोघांसह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.