उमेदवार निवडताना पॅनलप्रमुखांची होतेय दमछाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:21 IST2020-12-27T04:21:49+5:302020-12-27T04:21:49+5:30
कळमनुरी : तालुक्यातील १०९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम सध्या सुरू आहे. ३० डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. ...

उमेदवार निवडताना पॅनलप्रमुखांची होतेय दमछाक
कळमनुरी : तालुक्यातील १०९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम सध्या सुरू आहे. ३० डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. सध्या गावागावांत निवडणुकीच्या चर्चा रंगत आहेत. मात्र, उमेदवार निवडताना पॅनलप्रमुखांना चांगलीच कसरत करावी लागत आहे.
ग्रामपंचायत निडणुकीसाठी २४ डिसेंबर रोजी एकही उमेदवारी एकही अर्ज भरला नाही. तर दुसऱ्या दिवशी १७ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत. तसेच उमेदवारी अर्ज भरण्याच्या कालावधीतच तीन दिवस सलग सुट्ट्या आल्याने उमेदवार व पॅनलप्रमुख ऑनलाइन अर्ज भरण्यात गुंतले आहेत. कागदपत्रे जमा करण्यात उमेदवारांचा वेळ जात आहे. तसेच प्रत्येक पॅनल प्रमुखांजवळ इच्छुकांची संख्या वाढलेली आहे. कोणाला कोणत्या वाॅर्डात उभे करावे याची चाचपणी करण्यात येत आहे.
१ जानेवारी १९९५ नंतर जन्मलेल्या उमेदवारांना मात्र सातवी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. सरपंचाचे आरक्षणही शासनाने रद्द केल्यामुळे उमेदवार निवडताना पॅनलप्रमुखांची चांगलीच दमछाक होत आहे. गावातील चावडी, चौकाचौकांत, सार्वजनिक ठिकाणी निवडणुकीच्या गप्पांना चांगलेच उधाण आले आहे. प्रत्येक गावांत दोन-तीन पॅनल होत आहेत. उमेदवार निवडताना पॅनलप्रमुखांचा चांगलाच कस लागत आहे. इच्छुक मतदारांच्या घरोघरी जाऊन संवाद साधला जात आहे. तुमची साथ असेल तर आम्ही उमेदवारी अर्ज भरतो असे मतदारांजवळ सांगताहेत. मतदार मात्र सर्वांनाच हो म्हणून वेळ निभावून नेत आहेत.
कोरोनाच्या भीतीचा ग्रामीण भागात विसर पडलेला असून कोणीही सामाजिक नियमांचे पालन करीत नाहीत. सामाजिक अंतर पाळल्या जात नाही, मास्कचा वापर होत नाही, कोरोना ग्रामीण भागात हद्दपार झाला काय? या आविर्भावात नागरिक वावरत आहेत. पॅनलप्रमुखांकडून मात्र अजूनही उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. प्रत्येक पॅनल प्रमुखांजवळ इच्छुकांची संख्या वाढलेली आहे. दिवसा वीज व इंटरनेटच्या अडथळ्यांमुळे उमेदवार आपले नामनिर्देशनपत्र रात्रीच्या वेळी भरत आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यामध्ये नेटवर्कचा खोडा निर्माण होत आहे.
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तीनच दिवस उरले आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता सोमवारपासून तहसील कार्यालयात चांगलीच गर्दी राहणार आहे. निवडणुकीच्या गप्पांना ग्रामीण भागात चांगलेच उधाण आले आहे. थंडीबरोबरच निवडणुकीच्या गप्पाही चांगल्याच रंगात आलेल्या आहेत. शेकोट्या पेटवून त्याच्या सभोवती बसून ग्रामस्थ निवडणुकीच्या गप्पा करीत आहेत. प्रत्येक पॅनलप्रमुख आपलेच उमेदवार निवडून येतील असे सांगत आहेत. आता सगळ्यांच इच्छुकांना निवडणुकीच्या ताेंडावर गाव विकासाची चिंता लागलेली आहे. तसेच मतदारांना आपणच गावाचा सर्वांगीण विकास करू शकतो, असे पॅनलप्रमुख व इच्छुक उमेदवार सांगत आहेत.