साथीच्या आजारांमध्ये पुन्हा वाढ : ४० रुग्ण नव्याने दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:29 IST2021-09-03T04:29:50+5:302021-09-03T04:29:50+5:30
हिंगोली : साथीच्या आजारांमध्ये सतत वाढत होत असून गुरूवारी जिल्हा रुग्णालयात नव्याने ४० रुग्ण दाखल झाल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाच्या ...

साथीच्या आजारांमध्ये पुन्हा वाढ : ४० रुग्ण नव्याने दाखल
हिंगोली : साथीच्या आजारांमध्ये सतत वाढत होत असून गुरूवारी जिल्हा रुग्णालयात नव्याने ४० रुग्ण दाखल झाल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाच्या वतीने देण्यात आली. ३१ ऑगस्ट रोजी जिल्हा रुग्णालयातील पुरुष वॉर्ड, स्त्री वॉर्ड, आयसोलेशन वॉर्ड आदी वार्डात ४९ रुग्ण दाखल करण्यात आले होते. या रुग्णांपैकी काही रुग्णांना उपचार करून घरीही पाठविले आहे. परंतु, अजून काही उपचार घेत आहेत. १ सप्टेंबर रोजी ४० रुग्णांची यात भर पडली आहे. यामध्ये डेंग्यू १२, ताप व इतर आजारांचे १८, चिकनगुनिया व मलेरियाचे १० असे रुग्ण जिल्हा रुग्णालयातील विविध वॉर्डात दाखल करण्यात आले आहेत. या सर्व रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती रुग्णालयाने दिली.
- घराच्या आसपास स्वच्छता ठेवा-
डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया यासारखे आजार हे डासांमुळे उद्भवतात. त्यामुळे नागरिकांनी घराच्या आसपासचा परिसर स्वच्छ करावा. सांडपाणी दर दोन दिवसाला बदलून घ्यावे. साठवून ठेवलेले पाणी वापरू नये. घराच्या आसपास पाण्याचे डबके असतील तर ती जागा कोरडी करून घ्यावी. टायर, ट्यूब, जुनी लाकडे घराच्या आसपास ठेवली असतील तर ती काढून टाकावीत. दुपारी चार ते सायंकाळी सात वाजेदरम्यान घराची खिडकी बंद करावी.
- मुलांची काळजी घ्यावी गत पंधरा-वीस दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. व्हायरल फिवरमुळे मुले आजारी पडत आहेत. ताप, सर्दी, खोकला व इतर काही लक्षणे आढळून आल्यास लगेच जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा. डॉक्टरांनी दिलेली औषधी मुलांना द्यावी व मुलांची काळजी घ्यावी.
- डॉ. गोपाल कदम, बालरोगतज्ज्ञ