गंगाधर सितळे/ डोंगरकडा (जि. हिंगोली) : शक्तीपीठ महामार्गची जमीन मोजणी केली जाणार असल्याची माहिती भाटेगाव येथील शेतकऱ्यांना कळताच शेतकऱ्यांनी विरोध दर्शवित सोमवारी आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी काही शेतकऱ्यांना काही वेळापुरते ताब्यात घेतले. आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी शासनाच्या विरोधात घोषणाही दिल्या. यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
१५ सप्टेंबर रोजी कळमनुरी तालुक्यातील भाटेगाव येथे शक्तीपीठ महामार्गाची नोंदणी होणार असल्यामुळे प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी भूमिअभिलेख विभागाचे मोजणी अधिकारी जी. एस. फिरगे हे शक्तीपीठ महामार्गची मोजणी करण्यासाठी घटनास्थळी आले होते. यावेळी एक-दोन शेतकऱ्यांनी मोजणीसाठी संमती दिली, परंतु इतर शेतकऱ्यांना सदर मोजणी मान्य नव्हती. त्यामुळे भाटेगाव, डोंगरकडा, जवळापांचाळ, जामगव्हाण, सुकळीवीर, वसफळ, गूंडलवाडी या भागातील शेतकऱ्यांनी ‘शक्तीपीठ’ महामार्गाच्या मोजणीला विरोध केला.
आम्हाला देशोधडीला लागायचे नाही...
शक्तीपीठ महामार्ग आमच्यासाठी काहीच कामाचा नाही. शक्तीपीठाला जमीन दिली तर आम्ही देशोधडीला लागणार आहोत. त्यामुळे आमची जमीन ‘शक्तीपीठला’ कदापीही देणार नाहीत. तेंव्हा शासनाने आम्हाला ‘शक्तीपीठला’ जमीन द्यावी, असा आग्रह धरु नये. तसेच आमची जमीन मोजणीसाठी येवू नये, असा पवित्रा शेतकऱ्यांनी यावेळी घेतला. यावेळी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विष्णूकांत गुट्टे, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बसवंते, गणेश गोटके, जमादार संतोष नागरगोजे, शेख बाबर, सुनील रिठ्ठे, प्रभाकर भोंग, विठ्ठल जाधव, गणेश गायकवाड, अतुल मस्के आदींनी बंदोबस्त ठेवला होता.
काही शेतकऱ्यांना पोलिसांनी उचलले...
जमीन मोजणीच्यावेळी काही शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला. त्यावेळी अधिकाऱ्यांच्या सूचनेवरुन पोलिसांनी काही शेतकऱ्यांना उचलून गाडीत बसविले. यावेळी शेतकरी घोषणा देत होते. ‘आम्ही कदापीही शक्तीपीठ’ जमीन देणार नाही, अशी घोषणा यावेळी देण्यात येत होती.