दिल्लीवरून येणारा दीड कोटीचा गुटखा हिंगोलीत पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 18:02 IST2018-10-13T17:56:43+5:302018-10-13T18:02:15+5:30
ट्रकमध्ये जवळपास १ कोटी ६३ लाख रुपयाचा गुटखा असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दिल्लीवरून येणारा दीड कोटीचा गुटखा हिंगोलीत पकडला
हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील वारंगाफाटा येथे अवैधरीत्या गुटखा घेऊन जाणारा ट्रक पोलिसांनी आज दुपारी १२ वाजता पकडला. ट्रकमध्ये जवळपास १ कोटी ६३ लाख रुपयाचा गुटखा असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली येथून लातूरकडे एका ट्रकमधून गुटखा नेण्यात येत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. यावरून पोलिसांनी सापळा रचून वारंगाफाटा येथे एक ट्रक ( आरजे ११ - जीए- ९८४५ ) पकडला. ट्रकची तपासणी केली असता त्यात विविध कंपन्यांचा २३४ पोते गुटखा आढळला. या गुटख्याच्या बाजारातील किंमत जवळपास १ कोटी ६३ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. हा गुटखा आणि ट्रक असा एकूण १ कोटी ९३ लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिसांनी चालक जितेंद्र रमेश गौड (रा. बसई डांग ता. बारी जि. धौलपूर राजस्थान) व लोकेह पातीराम भारती ( रा. कोहुआ ) या दोघांना ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरु आहे.
ही कारवाई आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे सपोउपनि ओमकांत चिंचोलकर, शेख बाबर, संदीप चव्हाण, राजकुमार जमधाडे, मुलगीर आदींनी केली.