कृउबामध्ये भुईमुगाची दीडशे क्विंटल आवक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:33 IST2021-09-05T04:33:44+5:302021-09-05T04:33:44+5:30
हिंगोली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतीमाल आणणे चालू झाले असून, शनिवारी भूईमुगाची दीडशे क्विंटल आवक झाल्याची माहिती ...

कृउबामध्ये भुईमुगाची दीडशे क्विंटल आवक
हिंगोली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतीमाल आणणे चालू झाले असून, शनिवारी भूईमुगाची दीडशे क्विंटल आवक झाल्याची माहिती कृउबाचे सचिव नारायण पाटील यांनी दिली.
पाऊस कधी उघडीप देत आहे, तर कधी चालू राहत आहे. त्यामुळे शेतीमाल मोंढ्यात आणण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक समस्यांना समोरे जावे लागत आहे. अनेक समस्यांवर मात करीत शेतकऱ्यांनी शेतीमाल मोंढ्यात आणणे सुरू केले आहे. ४ सप्टेंबरला भुईमुगाची आवक १५० क्विंटल झाली. भुईमुगाला सरासरी भाव ५ हजार ७८० देण्यात येत आहे. सोयाबीन पिकाची १८ क्विंटल आवक झाली. सोयाबीनला ८ हजार ९५२ रुपये भाव देण्यात आला. तुरीची १५५ क्विंटल आवक झाली. तुरीला सध्या ६ हजार ३८० रुपये भाव देण्यात येत आहे. पोळा सणानिमित्त सोमवार व मंगळवार मोंढा बंद राहणार असून, शेतकऱ्यांनी या बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन सचिव पाटील यांनी केले आहे.
उडीद व मुगाची आवकही वाढली
गत दोन-तीन दिवसांपासून उडीद व मुगाची आवकही वाढली आहे. ४ सप्टेंबरला मुगाची ४० क्विंटल, तर उडिदाची २० क्विंटल आवक झाली आहे. मुगाला सरासरी ६ हजार ९५०, तर उडिदाला सरासरी ५ हजार ७२७ रुपये भाव देण्यात येत आहे. पावसाने चांगली साथ दिली, तर पिके चांगली येऊन शेतकऱ्यांना आर्थिक लाभ होऊ शकतो.