कळमनुरी (जि. हिंगोली): ओडिसा येथील भाविक देवदर्शनासाठी उज्जैन येथे जात असताना नांदेडहून हिंगोलीकडे जाणारी कार कळमनुरीजवळील बायपासवर उलटली. ही घटना १२ डिसेंबर रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात आईसह चिमुरडीचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
ओडिसा येथील पाच भाविक देवदर्शनासाठी उज्जैन येथे जात होते. कळमनुरीजवळ सदर कार (क्रमांक टीएस ०७ जीएक्स ३३८३) अचानक उलटली. अपघाताची माहिती पोलिसांना मिळताच पोलिस निरीक्षक मोहन भोसले, सहायक पोलिस निरीक्षक रघुनाथ शेवाळे, जमादार दिलीप पोले, दादासाहेब कांबळे, जगन पवार आदींनी घटनास्थळी जाऊन जखमींना येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
यातील रनिरा ऋषी कलावटिया (वय सहा महिने), चारूनिधी ऋषी कलावटिया (वय ३४, रा. चावरीया गंज अपर्णानगर कटक ओडिशा) यांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. तर जखमी असलेल्या ऋषी कलावटीया (वय ३४), दिलीप सिंग (वय ३६), प्रिन्सिसिंग (वय ३२) या तिघांवर प्राथमिक उपचार करण्यात आले. यानंतर पुढील उपचारासाठी हिंगोली येथे हलविण्यात आले. कार कशामुळे पलटी झाली याचे कारण मात्र कळू शकले नाही.