आता अवैध लेआउट आणि खरेदी-विक्री व्यवहारांना बसणार चाप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:28 IST2021-03-28T04:28:02+5:302021-03-28T04:28:02+5:30
हिंगोली शहरातील अवैध लेआउट तसेच गुंठे पद्धतीने जमिनीचे प्रकार काही नवे नाहीत, यापूर्वीही तसे सर्वेक्षण करण्यास आदेशित केले होते. ...

आता अवैध लेआउट आणि खरेदी-विक्री व्यवहारांना बसणार चाप
हिंगोली शहरातील अवैध लेआउट तसेच गुंठे पद्धतीने जमिनीचे प्रकार काही नवे नाहीत, यापूर्वीही तसे सर्वेक्षण करण्यास आदेशित केले होते. शंभरपेक्षा जास्त भूखंडांचे व्यवहार समोर आले होते. मात्र यात काहीच कारवाई झाली नाही. त्यामुळे भूमाफियांचा फावत असून त्यांनी हे प्रकार आता उघडपणे सुरू केले आहेत. शहराच्या आजूबाजूला अशा नवीन वस्त्या निर्माण होत असून या अवैध वस्त्यांना सेवा सुविधा देण्यासाठी भविष्यात नगरपालिकेला अडचणी येतात. मात्र भूखंड खरेदी करणाऱ्या मतदाररुपी नागरिकांना दिलासा देण्यासाठी नगरपालिका प्रयत्न करीत असते. त्यातच जुने अवैध बांधकामे नियमित करताना पालिकेची दमछाक होत असून या भागातील विकास कामे रखडली आहेत. त्यामुळे यावरून बोध घेत नगरसेवकांनीच या अवैध लेआउट प्रकरणावर आवाज उठविला आहे. दरम्यान, शहरातील विविध भागात असलेले खुले भूखंड काही ठिकाणी अतिक्रमणाला बळी पडले आहेत. तेही अतिक्रमणाच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी नगरसेवकांनी आवाज उठविल्याने त्याचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. नगरपालिकेच्या मालमत्ता कराची वसुली कमी होत असून अनेक नवीन भागात मालमत्ता कर लावला नसल्याने त्याचेही सर्वेक्षण करून मालमत्ता कर आकारणी करण्याचा आदेश दिला असल्याचे सांगण्यात आले. काही भागात अवैध नळजोडणी असून त्याचे सर्वेक्षण करून आतापर्यंतचा कर वसूल करीत या जोडण्या नियमित करून घेण्याची प्रक्रियाही राबविली जाणार आहे.
याबाबत मुख्याधिकारी कुरवाडे म्हणाले की, शहरात अवैध लेआउट नोटरीवर भूखंड खरेदी असे प्रकार वाढल्याचे सदस्यांनी सभेत मांडले. शहरातील सर्व अनधिकृत लेआउटचा सर्व्हे केला जाईल. तर अशा पद्धतीने विक्री होणाऱ्या भूखंडांचा व्यवहार नोंदवू नये असे पत्र नोंदणीच्या सहाय्यक निबंधकांना देण्यात येईल. त्याचबरोबर अधिकृत नोटरीधारकांनी अशा नोटरी करू नयेत, असेही पत्र काढले जाईल. या सर्व अवैध प्रकाराबाबत कारवाई करण्यात येईल. यापुढे असे प्रकार सुरु राहिल्यास संबंधितावर फौजदारी दाखल करण्यात येईल. अशा व्यवहारांमुळे जनतेची फसवणूक होते शिवाय नपला रस्ते पाणी नाली आधी सुविधा निर्माण करण्यात अडचणी येतात. पालिकेचा करही बुडतो त्यामुळे नागरिकांनी असे व्यवहार करू नयेत, असे आवाहन केले.