Normal weight babies in Hingoli: The birth rate of obese babies is low in the district | हिंगोलीत सर्वसाधारण वजनांचीच बाळे : जिल्ह्यात लठ्ठ बाळ जन्माला येण्याचे प्रमाण कमीच

हिंगोलीत सर्वसाधारण वजनांचीच बाळे : जिल्ह्यात लठ्ठ बाळ जन्माला येण्याचे प्रमाण कमीच

हिंगोली : सर्वसाधरण ४ किलोपेक्षा जास्त वजनाचे बाळ जन्मला आल्यास, असे बाळ लठ्ठ समजले जाते. लठ्ठ बाळ जन्माला येण्याचे प्रमाण मोठ्या शहरात जास्त असले तरी हिंगोलीसारख्या भागात सरासरी २.५० ते ३.५० किलो वजनाचीच बाळे जन्माला येतात. ४ किलोपेक्षा जास्त वजनाचे बाळ जन्माला येण्याचे प्रमाण अत्यंत कमी असल्याची माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

सरासरी २.५० ते ३.५० किलो वजनाचे बाळ जन्माला येते. मात्र, मागील काही वर्षांत लठ्ठ बाळ जन्माला येण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यातही मोठ्या शहरांमध्ये ४ व त्यापेक्षा जास्त वजनाची बाळे जन्माला येत आहेत. येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात मागील दोन वर्षांत ९ हजार ३७० बाळे जन्माला आली आहेत. यात ४ किलो वजनाच्या केवळ एक-दोन बाळांचाच समावेश आहे. २.५० किलो वजनापेक्षा कमी वजनाचे बाळ जन्मल्यास अशा बाळाला डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवले जाते. अशक्त माता, हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी यामुळे कमी वजनाचे बाळ जन्माला येऊ शकते, तसेच जास्त वजनाचे बाळ जन्माला आल्यासही अशा बाळासह मातेला डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवले जात असल्याची माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली. ग्रामीण भागात जास्त वजनाचे बाळ जन्माला आल्यास, असे बाळ सुदृढ बाळ समजले जाते. मात्र, मातेला शुगरसह इतर काही आजार असल्यास ४ किंवा त्यापेक्षा जास्त वजनाचे बाळ जन्माला येण्याची शक्यता असल्याचेही डॉक्टरांनी सांगितले.

पाच किलोपेक्षा जास्त वजनाच्या बाळाचे प्रमाण शून्य

जिल्ह्यात सरासरी २.५० ते ३.५० किलो वजनाचीच बाळे जन्माला आली आहेत. वर्षभरात केवळ एकाच बाळाचे वजन ४ किलो भरले आहे. त्यानंतर ३ किलो ९०० ग्रॅम वजनाचे बाळ जन्माला आलेले आहे. मोठ्या शहरात ५ किलो वजनाचे बाळ जन्माला येण्याचे प्रमाण असले तरी हिंगोलीसारख्या भागात जास्तीत जास्त ४ किलोपर्यंत बाळाचे वजन भरत आहे. ५ किलो वजनाचे बाळ जन्माला येण्याचे प्रमाण शून्य आहे.

कारण काय

एखाद्या मातेला शुगर व इतर आजार असतील, तर अशा मातेच्या नवजात बाळाचे वजन जास्त असते, तसेच एखाद्या मातेची अकाली प्रसूती, शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असल्यास, अशा मातेच्या नवजात बाळाचे वजन शक्यतो कमी भरते. जास्त वजन व कमी वजनाच्या बाळावर लक्ष ठेवावे लागते.

-डॉ. दीपक मोरे,

नवजात शिशू व बालरोगतज्ज्ञ, जिल्हा रुग्णालय हिंगोली

Web Title: Normal weight babies in Hingoli: The birth rate of obese babies is low in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.