इस्माईल जहागिरदार
वसमत : ट्रक्टर विहिरीत पडल्याने ९ मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना ४ एप्रिल रोजी पहाटे नांदेड जिल्ह्यातील आलेगावजवळ घडली आहे. या घटनेत ९ जण मृत पावल्याची भीती व्यक्त केली जात असून, हे सर्व मजूर वसमत तालुक्यातील गुंज येथील आहेत. या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे. तालुक्यातील गुंज गावापासून काही अंतरावर २० ते २५ कुटुंबियांची वस्ती आहे. या वस्तीवरील सर्व जण मजुरीची कामे करतात.
शुक्रवारी सकाळी हे मजूर ट्रॅक्टरने भुईमुग काढण्यासाठी जात होते. सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. तीन तासांपासून मदतीसाठी कोणतीही यंत्रणा पोहोचली नव्हती. साधारणत: सकाळी १० वाजण्याच्या सुमारास मदतकार्य सुरु झाले आहे. विहिरीत भरपूर पाणी आणि गाळ असल्याने ट्रॅक्टर पूर्णत: पाण्यात बुडाला होता. सौर ऊर्जेचा विद्युत पंप आणि जनरेटवरील मोटारचा वापर करुन विहिरीत पडलेल्यांना बाहेर काढले जात आहे. दरम्यान घटनेची माहिती समजताच गुंज गावावर शोककळा पसरली आहे. घटनेतील मृतांची नावे अद्याप स्पष्ट झाली नाही. या आमदार राजू नवघरे यांच्यासह गावातील अनेक महिला - पुरुषांनी घटनास्थळाकडे धाव घेतली आहे.
गुंज येथील ज्योती इरबाजी शिंदे (३५), सपना तुकाराम राऊत (२५), ताराबाई सटवा जाधव (३५), ध्रुपदा सटवाजी जाधव (१८), सरस्वती लखन भुरड (२५), सिमरन संतोष कांबळे (१८), चतुराबाई माधव पारधे (४५) या महिला ट्रॅक्टरने भुईमूग काढणीसाठी जात होत्या, अशी सध्याची प्राथमिक माहिती आहे.