हिंगोली : कोरोनाचा प्रादुर्भाव, तसेच अन्य तांत्रिक कारणांमुळे राज्य लोकसेवा आयोगाला राज्य सेवा पूर्व परीक्षा तीन ते चार वेळा पुढे ढकलावी लागली होती. तर काही नियुक्त्या रखडलेल्या आहेत. त्यात आगामी परीक्षांच्या तारखाच जाहीर झाल्या नसल्याने विद्यार्थ्यांमधून नैराश्याची भावना निर्माण होत आहे.
अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी घेऊन अनेक विद्यार्थी बारावीपासूनच स्पर्धा परीक्षेची तयारी करतात. जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थ्यांनी महागडे क्लासेस लावून स्पर्धा परीक्षेची तयारी केली होती. मात्र कोरोनामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्वप्नावर पाणी फेरले. कोरोना व इतर तांत्रिक कारणामुळे राज्य सेवा पूर्व परीक्षा तीन ते चार वेळा पुढे ढकलावी लागली होती. परिणामी विद्यार्थ्यांचे आर्थिक तसेच मानसिक खच्चीकरण होत आहे. एमपीएससीमार्फत यापूर्वी घेण्यात आलेल्या काही परीक्षांचा निकालही लागलेला नाही. तर काही परीक्षांत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना अद्याप नियुक्तीपत्र देण्यात आले नाही. त्यात आगामी स्पर्धा परीक्षांच्या तारखाही जाहीर झाल्या नसल्याने विद्यार्थ्यांचे मानसिक खच्चीकरण होत आहे. दोन दिवसांपूर्वीच पुण्यातील एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. त्यानंतर सर्व स्तरांतून संताप व्यक्त केला जात आहे.
क्लासचालकही अडचणीत
जिल्हा परिषद, पोलीस आदी विभागांसह एमपीएससीमार्फत होणारी पदभरती रखडली आहे. कोरोनामुळे क्लासेसही बंद ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे ऑनलाइन क्लासेस सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र ग्रामीण भागात इंटरनेटचा अडथळा असल्याने फारसा प्रतिसाद मिळाला नाही. सध्या क्लासेस बंद असले तरी इमारतीचे भाडे मात्र भरावे लागत आहे. अधिकारी घडविणारे शिक्षकच सध्या संकटात सापडले आहेत. शासनाने इतरांप्रमाणे स्पर्धा परीक्षा चालकांनाही मदत करावी.
- प्रा. भगवान मस्के, स्पर्धा परीक्षा केंद्रचालक
विद्यार्थ्यांचे वय निघून चालले!
मागील चार वर्षांत शासनाने नोकरभरतीच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून विविध पदांसाठी अर्ज भरून घेतले. परंतु, परीक्षाच घेतली नाही. काही परीक्षा घेतल्या तर अंतिम निकाल जाहीर केला नाही. यात विद्यार्थी, पालक कर्जबाजारी झालेत. शासनाने आता तरी स्पर्धा परीक्षांच्या तारखा निश्चित करून परीक्षा घ्याव्यात. त्यामुळे आत्महत्या घडणार नाहीत.
- जीवन अंभोरे, विद्यार्थी
अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी वयाची तीन ते चार वर्षे अभ्यासात घालवावी लागतात. मात्र मागील काही महिन्यांपासून शासनाच्या उदासीन धोरणामुळे अपेक्षाभंग होत आहे. त्यात विद्यार्थ्यांचे वय निघून चालल्याने विद्यार्थी खचला आहे.
- रवी शिंदे, विद्यार्थी
ऑनलाइन क्लास किती दिवस चालणार?
१) कोरोनाला रोखण्यासाठी सर्वात अगोदर क्लासेसवर निर्बंध घालण्यात आले होतेे. त्यामुळे सध्या ऑनलाइन पद्धतीने क्लास सुरू आहेत.
२) ऑनलाइन क्लास घेताना तांत्रिक अडचणी येत असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. तसेच मोबाइलवरच क्लास होत असल्याने डोळ्यांचे आजार वाढण्याची भीती आहे.
३) शासनाने अद्याप क्लासेसवरील निर्बंध हटविले नसल्याने आणखी किती दिवस ऑनलाइन क्लास चालवावे लागणार, असा प्रश्नही विद्यार्थी, क्लास चालकांतून निर्माण होत आहे.
या वर्षी परीक्षांच्या तारखा कधी जाहीर होणार?
कोरोनामुळे या वर्षी परीक्षा होणार की नाहीत याबाबत विद्यार्थी चिंतेत आहेत. सर्वसाधारणपणे एमपीएससीने २०२१ मध्ये होणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक डिसेंबरमध्येच जाहीर करणे अपेक्षित होते. मात्र अद्याप परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले नसल्याने विद्यार्थ्यांचे लक्ष तारखांकडे लागले आहे.