मोबाइलने आरोग्य बिघडवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:29 AM2021-03-06T04:29:00+5:302021-03-06T04:29:00+5:30

हिंगोली : प्रत्येक घरात आता अँड्रॉइड मोबाइल आला आहे. लॉकडाऊननंतर तर अनेक शाळांनी ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय निवडला. त्यामुळे मोबाइल ...

Mobile impairs health | मोबाइलने आरोग्य बिघडवले

मोबाइलने आरोग्य बिघडवले

Next

हिंगोली : प्रत्येक घरात आता अँड्रॉइड मोबाइल आला आहे. लॉकडाऊननंतर तर अनेक शाळांनी ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय निवडला. त्यामुळे मोबाइल वापराचे प्रमाण वाढल्याने मुलांमध्ये चिडचिडेपणा येत आहे, तसेच डोळे, डोक्याचे आजार वाढत आहेत.

मोबाइल जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. प्रत्येक व्यवहार ऑनलाइन झाला आहे. सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत मोबाइल महत्त्वाची भूमिका बजावत आहे. लॉकडाऊननंतर तर ऑनलाइन शिक्षण झाल्याने लहान मुलांकडेही मोबाइल आला. ऑनलाइन शिक्षणानंतर दिवसभर मोबाइलवर विविध गेम खेळण्यात लहान मुले दंग राहत आहेत. त्यामुळे मैदानी खेळाकडे दुर्लक्ष होत आहे. परिणामी, लहान मुलांमध्ये चिडचिडेपणा, एकटेपणा वाढला. खाण्याच्या वेळा बदलत असल्याने, तसेच शारीरिक हालचाली मंदावल्याने आरोग्याच्या समस्या उद्भवत आहेत. डोळ्यांचे आजार, डोक्याचे आजार वाढत असल्याच्या तक्रारी पालक करीत आहे. मुलांच्या हातातील मोबाइल काढून घेणे पालकांसमोर मोठे आव्हान उभे करीत आहेत. लहान मुलांपासून मोबाइल कसा दूर करावा, याची चिंता पालकांना लागली आहे.

मुले कायम मोबाइलवर

मुले कायम मोबाइलवर राहत असल्याने, त्यांची एकाग्रता विचलित होणे, त्यांच्यात चिडचिडेपणा, हट्टीपणा वाढतो. वेळेचे बंधन न पाळणे, जेवण, झोप वेळत न होणे, विविध वेबसाइटचा गैरवापर करणे, यातून विविध मानसिक आजार उद्भवू शकतात. त्यामुळे लहान मुलांवर वेळेचे बंधन घालणे, ज्येष्ठांनी लहान मुले मोबाइलवर काय बघतात, यावर लक्ष ठेवावे, जेवताना किंवा सर्वांसाेबत असताना मोबाइलचा वापर टाळावा, त्यांना छाेटी-छोटी पुस्तके वाचण्यास द्यावीत. छोटी-छोटी कामे सांगावीत, तसेच मोबाइलचे हट्ट पुरविणे थांबवावेत, असा सल्ला मनोविकार तज्ज्ञ डॉ.दीपक डोणेकर यांनी दिला.

विटीदांडू गायब

आमच्या लहानपणी विटीदांडू, लंगडी, काचेगोट्या, धावणे, उड्या मारणे, धप्पाकुटी आदी खेळ खेळत असत. यातून शरीर दणकट व चपळ राहण्यास मदत होत होती. एकाग्रता राहून आजारी पडण्याचे प्रमाणही कमी होते. मोबाइलमुळे आता हे सर्व खेळ कालबाह्य झालीत. लहान मुलेही मोबाइल घेऊन बसत आहेत. लहान मुलांनी थोडेतरी मैदानी खेळ खेळावेत, असे मत पालक व ज्येष्ठ नागरिक गजानन थोरात यांनी व्यक्त केले.

कोरोनामुळे मोबाइल गेम खेळण्याचे प्रमाण वाढले

कोरोनामुळे लहान मुले दिवसभर घरातच मोबाइलवर गेम खेळत आहेत. दिवसभर मोबाइल, लॅपटाॅपवर मुले राहत असल्याने, डोळ्यांच्या पापण्याची हालचाल कमी होते, तसेच डोळे लाल होणे, कचकच करणे, दूरवरचे न दिसणे आदी आजार निर्माण होतात. त्यामुळे कॉम्प्यूटर, मोबाइल, लॅपटॉप एक तास वापरानंतर किमान २० सेकंद डोळे बंद ठेवावेत. जागेवरच चक्कर मारून लांब बघून पुन्हा काम सुरू करावे, तसेच डोळे चांगले ठेवण्यासाठी जेवणात हिरव्या पालेभाज्या, ऋतुनुसार येणारी फळे खावीत, असा सल्ला नेत्ररोग तज्ज्ञ डॉ.किशन लखमावार यांनी दिला.

कोरोनामुळे घराबाहेर जाता येत नाही. त्यामुळे आम्ही घरातच खेळत असतो. मोबाइलवर गेम खेळत असलो, तरी आई-बाबा जास्त वेळ मोबाइल बघू देत नाहीत, अभ्यास झाल्यानंतर मोबाइल आई-बाबांकडे द्यावा लागतो.

- ओंकार खनपटे

कोरोनामुळे दिवसभर घरातच थांबावे लागते. कधीतरी मोबाइलवर गेम खेळतो. मोबाइल जास्त वेळ जवळ ठेवला, तर मम्मी-पप्पा मोबाइल काढून घेतात, तसेच घराजवळ खेळाचे मैदान नसल्याने घरातच कॅरम खेळतो.

- तन्मय पाईकराव

इनडोअर गेम ५६ टक्के

आउटडोअर गेम २६ टक्के

Web Title: Mobile impairs health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.