संवादाची दरी बिघडवू शकते मानसिक स्वास्थ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:34 IST2021-09-06T04:34:02+5:302021-09-06T04:34:02+5:30
हिंगोली : माणूस हा समाजशील प्राणी आहे. संवादातून सुख, दु:ख, प्रेम, जबाबदारी याची देवाण घेवाण होते. ज्या वेळेस संवाद ...

संवादाची दरी बिघडवू शकते मानसिक स्वास्थ !
हिंगोली : माणूस हा समाजशील प्राणी आहे. संवादातून सुख, दु:ख, प्रेम, जबाबदारी याची देवाण घेवाण होते. ज्या वेळेस संवाद साधणे थांबते, त्यावेळी भावनिक देवाण घेवाणही थांबते. भावनिक संवाद थाबतो, त्यावेळेस मानसिक आजारांना निमंत्रण मिळते. सध्या कोरोनामुळे प्रत्येकांचा संवाद कमी झाला असून यातून कलह निर्माण होत आहेत. पर्यायाने मानसिक स्वास्थ हरवत चालल्याचे दिसून येत आहे.
कोरोनामुळे अनेकांचा रोजगार गेला आहे. तसेच विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. यातून कौटुंबिक कलहही निर्माण होत असून यातून मानसिक स्वास्थ बिघडत चालले आहे. घरात पती-पत्नी, आई-वडिलांशी वाद होणे, घरातील छोट्या छोट्या गाेष्टी समजून न घेणे, झोप न लागणे, सतत चिडचिड वाटणे, कामात मन न लागणे, कामावर लक्ष न राहणे, विसराळूपणा येणे, शरीरावर, चेहऱ्यावर काळे डाग होणे तसेच वरिष्ठांचे फोन घेताना किंवा बैठकीस उपस्थित राहताना घबराहट होण्यासारखे प्रकार घडत आहेत. त्यामुळे मानसिक स्वास्थ टिकविण्यासाठी संवाद साधणे महत्त्वाचे ठरत आहे.
मन हलके करणे हाच उपाय
-घरी असताना मोबाइल बाजूला ठेवून पत्नी, आई-वडील, मुले यांच्याशी संवाद साधावा. त्यांच्यासमोर आपले मन मोकळे करा.
-घरी, कार्यालयात असताना समोरील व्यक्तींनाही महत्त्व देणे. त्यांच्या सोबत आपला संवाद साधणे.
- केवळ मोबाइलवरून न बोलता समोरासमोर बोलण्याचा प्रयत्न करावा.
माणूस हा समाजशील प्राणी आहे. त्यामुळे घर, कार्यालय, कॉलनी, गाव, समाजात वावरताना संवाद साधणे महत्त्वाचे आहे. ज्या वेळेस संवाद साधणे थांबतो, त्यावेळेस भावनिक देवाण घेवाणही थांबते. भावनिक संवाद थाबतो, त्यावेळेस मानसिक आजारांना निमंत्रण मिळते. त्यामुळे संकट कितीही मोठे असले तरी संवाद साधल्यास मन हलके होऊन त्यातून मार्ग सापडतो. संवाद साधणे महत्त्वाचे आहे.
-डॉ. दीपक डोणेकर, मानसोपचार तज्ज्ञ, हिंगोली