स्वस्तात डिझेल देतो म्हणून अनेकांना चुना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2019 12:19 AM2019-04-02T00:19:26+5:302019-04-02T00:19:46+5:30
अर्ध्या किमतीत डिझेल देतो म्हणून एक व्यक्ती फोन करून घरी येतो, डिझेलचे ठरलेले पैसे घेवून थोड्या वेळात डिझेल आणून देतो म्हणून पसार होत असल्याच्या अनेक घटना वसमत तालुक्यात घडत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वसमत : अर्ध्या किमतीत डिझेल देतो म्हणून एक व्यक्ती फोन करून घरी येतो, डिझेलचे ठरलेले पैसे घेवून थोड्या वेळात डिझेल आणून देतो म्हणून पसार होत असल्याच्या अनेक घटना वसमत तालुक्यात घडत आहेत. अर्ध्या किमतीत डिझेलची लालूच अनेकांना महागात पडत आहे. फसगत झाल्याची तक्रार द्यावी तर इभ्रत जाते म्हणून कोणी तक्रार देत नाही, अशा फसगत झालेल्यांपैकी दोघांनी वसमत शहर पोलिसांत तक्रार अर्ज दिला आहे.
लालच बुरी बला है, असे म्हणतात. मात्र स्वस्तात माल मिळतो म्हटले की, अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. चोरीचा माल आहे की, कसे हेसुद्धा कोणी पाहत नाही, आणि मग फसवणूक झाली की, गप्प बसल्याशिवाय पर्याय नाही. असाच एक प्रकार वसमत तालुक्यात काही दिवसांपासून घडत आहे. वाहनधारकांना फोनवर एक व्यक्ती संपर्क साधतो. तुम्हाला डिझेल पाहिजे का? मी एक गुत्तेदाराकडे काम करतो वाहनातील बचत केलेले ५० ते १०० लिटर डिझेल आहे. अर्ध्या किमतीत देतो, असे म्हणून तो व्यक्ती लालूच देतो. स्वस्तात डिझेल तेही घरबसल्या म्हणून वाहनधारकही त्याला घरी या असे सांगतात. मग ती व्यक्ती घरी येते. शंभर लिटर डिझेल ३० ते ३५ रुपये दराने देतो म्हणून त्याची रक्कम द्या गाडीत कॅन आहे आणून देतो, असे म्हणून रक्कम घेतो व पसार होत आहे. डिझेलची वाट पाहत वाहनधारक घरीच बसतात. तास- दोन तासानंतर आपली फसगत झाल्याचे स्पष्ट होते. ज्या क्रमांकावरून फोन आलेला असतो तो क्रमांकही बंद असतो.
वसमत शहर पोलिसांत सोमवारी संजय खराटे यांनी तक्रार अर्ज देऊन ८० लिटर डिझेल देतो म्हणून अडीच हजार रुपये घेऊन फसवणूक झाल्याचा अर्ज दिला आहे. या अर्जावरून पो.ना. भगीरथ सवंडकर तपास करीत आहेत. यापूर्वीही कौठा रोडवरील एका व्यक्तीने ३ हजाराला फसवणूक झाल्याचा अर्ज दिला होता. अशा कित्येक जणांना चुना लागलेला आहे. मात्र पोलिसांकडे कोणीही आले नाही. ग्रामीण भागातही फसवणुकीच्या तक्रारी आहेत. परंतु आतापर्यंत दोनच तक्रार अर्ज आलेले आहेत.