मग्रारोहयोत जनजागृती करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 00:30 IST2018-11-18T00:30:33+5:302018-11-18T00:30:52+5:30
जिल्ह्यात मग्रारोहयोच्या कामांची माहिती व्हावी, मजूर उपस्थिती वाढावी यासाठी आता जनजागृतीसाठी रंगरंगोटीची कामे हाती घेतली जाणार आहेत. ज्या भागात मग्रारोहयोत मोठ्या प्रमाणात झाली अशा ठिकाणी हे काम होणार आहे. सध्या १४३ कामांवर ८८४ मजुरांची उपस्थिती होती.

मग्रारोहयोत जनजागृती करणार
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यात मग्रारोहयोच्या कामांची माहिती व्हावी, मजूर उपस्थिती वाढावी यासाठी आता जनजागृतीसाठी रंगरंगोटीची कामे हाती घेतली जाणार आहेत. ज्या भागात मग्रारोहयोत मोठ्या प्रमाणात झाली अशा ठिकाणी हे काम होणार आहे. सध्या १४३ कामांवर ८८४ मजुरांची उपस्थिती होती.
यंदा दुष्काळी स्थिती असतानाही मग्रारोहयोच्या कामांवर फारशी मजूर उपस्थिती नाही. मग्रारोहयोच्या कामांवर कमी मजुरी मिळण्याच्या कारणाने मजूर इतर कामांकडे वळतात. ऊसतोड, बांधकामाची कामे केल्यास अधिकची मजुरी मिळते. त्यामुळे या मजुरांचा ओढा या कामांकडेच दिसतो. त्यामुळे स्थलांतर होते. आता बहुतांश भागातील मजुरांनी स्थलांतर केले. रबीची पेरणीही कमीच प्रमाणात होणार असल्याने अनेक शेतकऱ्यांनाही मग्रारोहयोतून शेतीतील कामे करणे शक्य आहे. शिवाय स्थलांतर टाळून मुलांच्या शिक्षणाचीही गैरसोय टाळता येणार आहे. त्यामुळे समृद्ध महाराष्ट्रमधील ११ कलमी कार्यक्रमावर भर देवून यातील उद्दिष्टानुरुप कामे होण्यासाठी जनजागृतीपर रंगरंगोटी केली जाणार आहे. यात योजनेची वैशिष्ट्ये, स्वरुप व कामे मागण्याची पद्धत आदी बाबींवर भर राहणार आहे. यावर्षी जिल्ह्याला ९.४१ लाख मनुष्यदिवस रोजगार उपलब्ध करून देण्याचे वार्षिक उद्दिष्ट होते. मात्र सध्याच ९.५३ लाख मनुष्यदिवस रोजगार उपलब्ध करुन दिला आहे. या कामांवर आतापर्यंत अकुशलवर १९.७१ तर कुशलवर ५.९५ कोटी असा २७ कोटींचा खर्च झाला आहे. या योजनेत सध्या १७0 कामे सुरू असून केवळ ८८४ मजूर उपस्थिती आहे. यात औंढा तालुक्यात ७ ग्रा.पं.च्या १४ कामांवर ४७, वसमतला ३ ग्रा.पं.च्या ३४ कामांवर २२२, हिंगोलीत १८ ग्रा.पं.च्या ३६ कामांवर २४४, कळमनुरीत १0 ग्रा.पं.च्या ७५ कामांवर २६८, सेनगावात ८ ग्रा.पं.च्या ११ कामांवर १0३ मजुरांची उपस्थिती आहे. दुष्काळी चित्र असल्याने मजूर उपस्थिती वाढीसाठी संधी असतानाही तसे प्रयत्न गावपातळीपासूनच कोणी करीत नसल्याचे दिसून येत आहे. आता जनजागृतीचा कितपत फायदा होईल, हे काळच सांगणार आहे.