लांब पल्ल्याच्या एसटी बसेस सुसाट; मुक्कामी गाड्या कधी सुरू होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:03 IST2021-09-02T05:03:56+5:302021-09-02T05:03:56+5:30

हिंगोली : सध्या सणासुदीचे दिवस असून, ग्रामीण भागातून येणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढू लागली आहे; परंतु बसेस सुरू करण्याबाबत शासनाचा ...

Long haul ST buses; When will the stop train start? | लांब पल्ल्याच्या एसटी बसेस सुसाट; मुक्कामी गाड्या कधी सुरू होणार?

लांब पल्ल्याच्या एसटी बसेस सुसाट; मुक्कामी गाड्या कधी सुरू होणार?

हिंगोली : सध्या सणासुदीचे दिवस असून, ग्रामीण भागातून येणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढू लागली आहे; परंतु बसेस सुरू करण्याबाबत शासनाचा आदेश आला नसल्यामुळे मुक्कामी व इतर बसेस सुरू करता येणार नाहीत, असे एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

महालक्ष्मी, पोळा यासारखे मोठे सण तोंडावर आले आहेत. शेतकरी वर्ग पोळा सणाच्या तयारीला लागला आहे. बैलांसाठी झुली, घागरमाळा, गोंडे व इतर साहित्य खरेदी करण्यासाठी शेतकरी शहराच्या ठिकाणी येत आहेत; परंतु मुक्कामी बसेस सुरू नसल्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांची तारांबळ उडत आहे. नाइलाजाने दामदुप्पट पैसे देऊन अवैध वाहतुकीने प्रवास करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. अनेक वेळा प्रवाशांनी ग्रामीण भागातील बसेस सुरू करण्यासाठी मागणीही केली आहे.

ग्रामीण भागात जाणाऱ्या गाड्यांतही जागा मिळेना...

कोरोना महामारी कमी झाल्यामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. दुपारी बारा वाजेपर्यंत तरी गर्दी नसते; परंतु दुपारी एक वाजेनंतर मात्र एसटी बसेसला गर्दी वाढू लागली आहे. यादरम्यान, प्रवाशांना सामाजिक अंतर व मास्कबाबत सूचना दिली जात असल्याचे एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

लांब पल्ल्याच्या गाड्या फुल...

मागच्या दोन महिन्यांपासून सोलापूर, कोल्हापूर, पुणे, औरंगाबाद, अकोला, नांदेड, परभणी, बीड, लातूर आदी ठिकाणच्या बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. लांब पल्ल्याच्या बसेसला प्रवासीही मिळू लागले आहेत. लांब पल्ल्याचा प्रवास असल्यामुळे चालक, वाहकांना काळजी घेण्यास सांगितले जात आहे.

मुक्कामी गाडी येत नसल्याने होतोय त्रास...

कोरोनाआधी ग्रामीण भागात मुक्कामी बसेस होत्या; परंतु सद्य:स्थितीत मुक्कामी बसेस सुरूच केल्या नाहीत. परिणामी, अतोनात त्रास होत आहे. खासगी वाहनाने प्रवास करण्याची वेळ आली आहे. महामंडळाने ग्रामीण भागातील बसेस सुरू कराव्यात.

-बालाजी मुगावे, प्रवासी

पोळा सण जवळ आला आहे. पोळ्याचे साहित्य ग्रामीण भागात मिळत नाही. यासाठी शहराच्या ठिकाणी जावे लागते; परंतु जाण्यासाठी गावातून वाहन मिळत नाही. याकरिता एसटी महामंडळाने ग्रामीण भागात बसेस सुरू कराव्यात.

-नागोराव कऱ्हाळे, प्रवासी

बसेस सुरू करण्याचे ग्रापंनी दिले पत्र

जिल्ह्यातील सावरगाव व धानोरा येथील ग्रामपंचायतींनी महामंडळाला पत्र दिल्यामुळे या भागातील बसेस काही दिवसांकरिता सुरू केल्या आहेत; परंतु रोज प्रवासी संख्या मिळाली नाही तर बसेस बंद केल्या जातील, असेही महामंडळाने सांगितले.

कोरोना नियमांचे केले जाते पालन

कोरोना महामारी कमी झाली असली तरी संपली नाही. रोज एक-दोन रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे चालक-वाहकांना कोरोना नियमांबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. प्रवाशांनाही मास्क वापरण्याबाबत सांगण्यात येत आहे.

-संजयकुमार पुंडगे, स्थानकप्रमुख

Web Title: Long haul ST buses; When will the stop train start?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.