कोरोना आजार असेपर्यंतच नोकरी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:26 IST2021-03-07T04:26:59+5:302021-03-07T04:26:59+5:30
हिंगोली: ' एनआरएचएम ' या केंद्र शासनाच्या अभियानांतर्गत जिल्ह्यातील एकूण ६ ठिकाणी कोरोना केअर सेंटर उभारण्यात आले असून सर्वच ...

कोरोना आजार असेपर्यंतच नोकरी !
हिंगोली: ' एनआरएचएम ' या केंद्र शासनाच्या अभियानांतर्गत जिल्ह्यातील एकूण ६ ठिकाणी कोरोना केअर सेंटर उभारण्यात आले असून सर्वच ठिकाणी कंत्राटी स्वरुपात अधिकारी- कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील कळमनुरी, वसमत, सेनगाव, औंढा येथे प्रत्येकी १ आणि हिंगोली येथे जिल्हा रुग्णालयात १ आणि औंढा रोडवर १ असे दोन कोरोना सेंटर उभारण्यात आले आहेत. या सर्वच ठिकाणी कोरोना रुग्णांची व्यवस्थितरित्या देखभाल केली जाते. कोरोनाचे रुग्ण सर्वत्र वाढू लागल्याचे पाहून केंद्र शासनाच्या ‘एनआरएचएम’ अभियानातंर्गत वैद्यकीय अधिकारी २५, स्टाफनर्स ४९, विशेष तज्ज्ञ स्पेशालीस्ट ८, लॅब टेक्नेशियन १५, स्वच्छतासेवक ३० अशा जवळपास १२७ अधिकारी, कर्मचाऱ्यांना कंत्राटी तत्वावर म्हणजे काहींना तीन महिन्यांची तर काहींना सहा महिन्यांची ऑर्डर देवून कामावर घेतलेले आहे. जीवाची पर्वा न करता जिल्ह्यातून आलेल्या रुग्णांची अस्थेवाईकपणे चौकशी करुन त्यांची सेवा कंत्राटी अधिकारी- कर्मचारी करीत आहेत. कोरोना आजार वाढू लागल्याने शासनाने आमचा कंत्राटी तत्वावर विचार केला. कोरोना संपला तर आमचे कसे होईल, हा प्रश्न सतावू लागला आहे. तेव्हा केंद्र शासनाने सर्वच कंत्राटी अधिकारी- कर्मचाऱ्यांना कोरोनानंतरही कायमस्वरुपी कामावर घेतल्यास बरे होईल.
अधिपरिचारिका म्हणून सहा महिन्यांसाठीची ऑर्डर दिली. मी तीन वर्षांपासून काम करीत असून शासनाने पुढे कायमस्वरुपी करावे, एवढीच इच्छा आहे.
- शीतल झरकर, हिंगोली
शासनाने कोविड सेंटरमध्ये कंत्राटी स्वरुपात अधिपरिचारिका पदावर घेतले आहे. आजमितीस शासनाने पुढचा विचार करुन कायमस्वरुपी करावे.
- ताई इंगोले, हिंगोली
कोविड सेंटरमध्ये सहा महिन्यांपासून अधिपरिचारीका पदावर काम करीत आहे. सहा महिने झाले आहेत. जोखमीचे काम करावे लागत आहे.
- कल्पना डाके, हिंगोली