पाच महिन्यांमध्ये ८ गावांमध्ये पाणी नमुन्यांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:33 IST2021-08-12T04:33:43+5:302021-08-12T04:33:43+5:30
हिंगोली : वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या वतीने मार्च ते जुलै २०२१ या कालावधीत पाण्याची रासायनिक ...

पाच महिन्यांमध्ये ८ गावांमध्ये पाणी नमुन्यांची तपासणी
हिंगोली : वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या वतीने मार्च ते जुलै २०२१ या कालावधीत पाण्याची रासायनिक आणि जैविक तपासणी करण्यात आली. तपासणीअंती २१९ पाणी नमुने हे दूषित आढळून आले आहेत.
वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमार्फत औंढा, वसमत, हिंगोली, कळमनुरी आणि सेनगाव येथे रासायनिक व जैविक तपसणीअंती घटकनिहाय दूृषित पाण्याचे नमुने तपासण्यात आले. टीडीएस या घटकांतर्गत २ हजारपेक्षा अधिक मात्रा असलेले पाणी नमुने १०, फ्लोराइड घटकांतर्गत ४५ पेक्षा अधिक मात्रा असलेले पाणी नमुने २९, नायट्रेट घटकांतर्गत ४५ पेक्षा अधिक पाणी नमुने ६०, आयर्न घटकांतर्गत १.० पेक्षा अधिक मात्रा असलेली पाणी २६ नमुने आढळून आले. पाणी नमुने दूषित आढळून आल्यास संबंधित पाचही तालुक्यांच्या गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना सूचित करून यावर उपाययोजना करण्याचे सांगितले जाते. जिल्ह्यात हिंगोली येथे एक मुख्य प्रयोगशाळा असून कळमनुरी, सेनगाव आणि वसमत येथे प्रत्येकी एक उपविभागीय प्रयोगशाळा आहे. नॅशनल ॲक्रिडेशन बोर्ड फॉर लॅबोरेटरीज (एनएबीएल) या परीक्षणातून सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचेही सहायक भूवैज्ञानिक मांजरमकर यांनी सांगितले.
पाणी नमुने प्रयोगशाळेत पाठवले जातात...
पाणी नमुन्यांची तपासणी जिल्ह्यात वर्षातून दोन वेळा केली जाते. ग्रामपंचायत कार्यालयाच्या जल सुरक्षामार्फत पाण्याचे नमुने जिल्ह्यातील मुख्य प्रयोगशाळेत पाठविले जातात. त्यानंतर पाण्याची प्रयोगशाळेत तपासणी करून अहवाल दिला जातो. सदरील प्रयोगशाळेत खाजगी पाणी नमुन्यांचीही तपासणी करण्यात येते. नागरिकांनी प्रयोगशाळेत पाणी नमुने घेऊन यावेत.
- रवींद्र मांजरमकर, सहायक भूवैज्ञानिक