२२५ रूपये वाढविले, अन् केवळ १० रूपये कमी केले व्वा रे चालाखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:26 IST2021-04-03T04:26:12+5:302021-04-03T04:26:12+5:30

महागाई दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीने सर्वसामान्य जनता त्रस्त असताना त्यात खाद्यतेलाच्या दरवाढीने आणखीन तेल ओतले आहे. ...

Increased by Rs. 225, decreased by only Rs | २२५ रूपये वाढविले, अन् केवळ १० रूपये कमी केले व्वा रे चालाखी

२२५ रूपये वाढविले, अन् केवळ १० रूपये कमी केले व्वा रे चालाखी

महागाई दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीने सर्वसामान्य जनता त्रस्त असताना त्यात खाद्यतेलाच्या दरवाढीने आणखीन तेल ओतले आहे. गॅस सिलींडरचे दरही गगणाला भिडले असून मागील सहा महिन्यात तब्बल २२५ रूपयांनी गॅस सिलींडर महाग झाला आहे. त्यामुळे गृहिणीचे बजेट कोलमडले आहे. सर्वसामान्यांतून ओरड होत असल्याची जाणीव होताच शासनाने एक एप्रिलपासून घरगुती गॅस सिलींडरच्या किमती दहा रूपयांनी स्वस्त करण्याचा निर्णय घेतला. गॅस सिलींडरचे दर कमी झाल्याचा गवगवा करण्यात येत असला तरी यात निव्वळ चालाखी करण्यात आल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील गॅसवरील स्वयंपाकच बंद झाल्याचे चित्र आहे. पुन्हा चुली पेटल्या असून महिलांना धुराचा सामना करावा लागत आहे. खाद्यतेलानंतर गॅस सिलींडरचे दर वाढल्याने तुटपुज्या उत्पन्नात घर कसे चालवायचे, असा प्रश्न निर्माण होत आहे.

सहा महिन्यात २२५ रूपयांनी महाग झाले गॅस सिलींडर

मागील सहा महिन्यात घरगुती गॅस सिलींडरच्या किमतीत तब्बल २२५ रूपयांनी वाढ झाली आहे. नोव्हेंबर २०२० मध्ये ६२० रूपयांना मिळणारा गॅस सिलींडर डिसेंबर महिन्यात ७२० रूपयांना मिळत होता. डिसेंबर, जानेवारी २०२१ मध्ये हाच दर होता. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात तब्बल १०० रूपयांनी वाढ होत सिलींडर ८२० रूपयांवर पोहचला. मार्च महिन्यात ८४५ रूपयांना मिळत होता. १ एप्रिलपासून यात १० रूपयांनी दर कमी झाल्याने आता ८३५ रूपयांना मिळत आहे.

गॅस सिलींडर ८४५ रूपयांना खरेदी करावा लागत होता. एक एप्रिलपासून दहा रूपयांनी सिलींडर स्वस्त झाल्याचे सांगितले जात असले तरी यातून कोणताही दिलासा मिळाला नाही. त्यामुळे नाईलाजाने चुलीवर स्वयंपाक करावा लागत आहे.

- रेखा कांबळे, गृहिणी, हिंगोली

खाद्यतेलाच्या दरवाढीने आर्थिक गणित बिघडले असताना त्यात गॅस दरवाढीची भर पडली आहे. आता दहा रूपयांनी गॅस सिलींडर स्वस्त केला तरी यातून कोणताही दिलासा मिळला नाही. त्यामुळे गॅस सिलींडर वापरावे की नाही, असा प्रश्न निर्माण होत आहे.

- स्मिता शेळके, गृहिणी, हिंगोली

गॅस सिलींडरचे दर परवडत नसल्याने पुन्हा चुलीवर स्वयंपाक करावा लागत आहे. दहा रूपयांनी सिलींडर स्वस्त झाला तरी यातून केवळ चालाखीच दिसून येत आहे. खाद्यतेलाच्या दरवाढीनंतर गॅस सिलींडरच्या वाढलेल्या किमतीने आर्थिक गणित कोलमडले आहे.

-श्रद्धा बोरकर , गृहिणी, हिंगोली

Web Title: Increased by Rs. 225, decreased by only Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.