आवक वाढल्याने भाजीपाला झाला स्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:18 IST2021-01-13T05:18:20+5:302021-01-13T05:18:20+5:30
यावर्षी पाऊस चांगला झाल्याने विहिरी, तलावांना मुबलक प्रमाणात पाणी आहे. त्यामुळे पालेभाज्यांची आवक वाढली आहे. शहरातील ...

आवक वाढल्याने भाजीपाला झाला स्वस्त
यावर्षी पाऊस चांगला झाल्याने विहिरी, तलावांना मुबलक प्रमाणात पाणी आहे. त्यामुळे पालेभाज्यांची आवक वाढली आहे. शहरातील भाजी मंडईमध्ये भांडेगाव, वळद, समगा, माळेगाव, इंचा, केंद्रा, डिग्रस, सेनगाव, पळशी, जवळा, नरसी आदी गावांतील विक्रेते पालेभाज्या विक्रीसाठी आणतात. ठोक विक्रेत्यांकडून किरकोळ विक्रेत्यांना भाज्यांची विक्री केली जाते. मकर संक्रांत दोन दिवसांवर येवून ठेपली असल्याने भाजीपाला स्वस्त झाल्याने ग्राहकांत आनंद आहे.
मंडईमध्ये टोमॅटो १० रुपये किलो, पानकोबी १० रुपये किलो, फूलकोबी १० रुपये, काकडी २५ रुपये किलो, चवळी २५ रुपये किलो, गाजर ३० रुपये किलो, कांदा ४० रुपये किलो, कारले ४० रुपये, ढोबळी मिरची ३० रुपये किलोने विक्री झाली. दुसरीकडे मंडईत वांगी, हिरवी मिरची, शेवगा आदींची आवक कमी होती. वांगी ४० रुपये, हिरवी मिरची ५० रुपये तर शेवगा शेंगा १०० रुपये किलोने विक्री झाल्याचे पहावयास मिळाले.
मकर संक्रांती सणाला तीळगुळाचा मान असतो. त्यामुळे तीळ आणि गुळ महाग होऊन तेल स्वस्त होईल, असे वाटले होते. परंतु, शहरातील बाजारपेठेत गुळ ३५ रुपये किलो, तीळ १३० रुपये किलो तर साखर ३५ रुपये किलो दराने विक्री झाल्याचे विजय बगडीया यांनी सांगितले.
मागच्या आठवड्यापेक्षा यावेळेस डाळिंबची आवक फारच कमी आहे. डाळिंब १५० रुपये किलोने विक्री होत आहे. सफरचंद १०० रुपये, चिकू ६० रुपये, केळी ३० रुपये, अननस ८० रुपये, संत्रा ८० रुपये तर जांब ४० रुपये किलोने मंडईत विक्री झाल्याचे पहायला मिळाले.
नवीन वर्षात इतर वस्तू स्वस्त झाल्या असला तरी तेलाचे भाव मात्र वाढलेले पहायला मिळत आहेत. सोयाबीन १३० रुपये किलो तर सूर्यफूल तेल १४० रुपये किलोने विक्री झाल्याचे दिसून आले.
शहरातील मंडईमध्ये मकर संक्रांतीच्या तोंडावर शेवगा, वांगी, हिरवी मिरची वगळता सर्व पालेभाज्यांची आवक वाढली आहे. त्यामुळे भाज्यांचे भाव उतरले आहेत.
-तानाजी शितुळे, भाजीविक्रेता, खरबी.
मकर संक्रांत दोन दिवसांवर येवून ठेपली आहे. संक्रांतीला पालेभाज्यांचे दर वाढतील असे वाटले होते. परंतु, पालेभाज्या स्वस्त दरात मिळत आहेत. त्यामुळे ग्राहकांत आनंद आहे.
-सीमा नागरे, हिंगोली
डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात फळांची आवक थोडी वाढली होती. यावेळेस सर्वच फळांची आवक कमी झाली आहे. डाळिंब १५० रुपयेकिलोने विक्री होत आहे.
-कयूम बागवान, फळविक्रेता, हिंगोली