अवैध प्रवासी वाहतुकीमुळे एसटीचे उत्पन्न घटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:24 IST2020-12-25T04:24:04+5:302020-12-25T04:24:04+5:30
कळमनुरी : येथील आगारातून शहरी भागासाठी बसफेऱ्या सोडण्यात येत आहेत. परंतु, ग्रामीण भागात अजूनही येथील आगाराने बसेस सोडलेल्या ...

अवैध प्रवासी वाहतुकीमुळे एसटीचे उत्पन्न घटले
कळमनुरी : येथील आगारातून शहरी भागासाठी बसफेऱ्या सोडण्यात येत आहेत. परंतु, ग्रामीण भागात अजूनही येथील आगाराने बसेस सोडलेल्या नाहीत. त्यामुळे तालुक्यात अवैध प्रवासी वाहतूक बोकाळल्यामुळे आगाराच्या उत्पन्नात घट झाली आहे. काेराेनामुळे मागील मार्च महिन्यांपासून ग्रामीण भागात बंद असलेली बससेवा अजूनही सुरू केली नाही. कळमनुरी आगारातून ग्रामीण भागासाठी बसेस सोडण्यात आलेल्या नाहीत. शहरी भागातच एसटीच्या बसफेऱ्या सुरू आहेत. यामुळे ग्रामीण भागात अवैध प्रवासी वाहतूक बोकाळली आहे. यामुळे एसटीचे उत्पन्न घटत चालले आहे. हिंगोली - नांदेड मार्गावर खासगी बसेस चालतात. त्यामुळे या मार्गावरील एसटीचे उत्पन्न कमी झाले आहे. ग्रामीण भागात बसफेऱ्या सुरू नसल्याने अवैध वाहतूकवाले ग्रामीण भागात पोहोचले असून अवैध वाहतुकींने चांगलेच डोके वर काढले आहे. ग्रामीण भागात बसेस सुरू नसल्याने या भागातील नागरिकांना अवैध प्रवासी वाहतुकीचा सहारा घेतल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे येथील आगाराचे दररोजचे साडेतीन लाखांचे उत्पन्न बुडत आहे. अवैध प्रवासी वाहतुकीमुळे आगाराचे उत्पन्न कमी होत आहे. या वाहतुकीला आळा घालण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
कळमनुरी आगारातील १४ चालक - वाहक मुंबई येथे गेले आहेत. यामुळे येथे वाहक - चालकांची संख्या कमी असल्यामुळे ग्रामीण भागात बसेस सोडण्यात येत नाहीत. परंतु, अनेकांकडून ग्रामीण भागात बसेस सोडण्याची मागणी होत आहे. चालक वाहकांअभावी ग्रामीण भागात बसेस सोडण्यात येत नाहीत. मुंबईहून चालक - वाहक परत आल्यानंतर ग्रामीण भागांमध्ये बसेस सोडण्यात येणार असल्याची माहिती स्थानक प्रमुख शेख फेरोज यांनी दिली.