ताप न आल्यास विश्वास बसेना; लस खरी की खोटी ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:35 IST2021-09-08T04:35:26+5:302021-09-08T04:35:26+5:30
हिंगोली: लसीकरणानंतर ताप न आल्यास लसीवर विश्वास बसेना झाला आहे; परंतु तसे काही नाही. ताप येवो अथवा न येवो. ...

ताप न आल्यास विश्वास बसेना; लस खरी की खोटी ?
हिंगोली: लसीकरणानंतर ताप न आल्यास लसीवर विश्वास बसेना झाला आहे; परंतु तसे काही नाही. ताप येवो अथवा न येवो. कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन्ही लस कोरोनावर मात करणाऱ्या आहेत. तेव्हा नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत ४ लाख ११ हजार ७२४ एवढे लसीकरण झाले आहे. यामध्ये कोविशिल्डचे ३ लाख २७ हजार ६२४ तर कोव्हॅक्सिनचे ८४ हजार १०० डोसचा समावेश आहे. यापैकी पहिला डोस ३ लाख २१ हजार २३० तर दुसरा डोस ९० हजार ४९४ एवढा झाला आहे. १६ जानेवारी २०२१ पासून लसीकरणाला सुरुवात झाली आहे. कोरोना महामारीची तिसरी लाट लक्षात घेता नागरिकांनी जवळच्या लसीकरण केंद्रावर जावून लस घ्यावी. बाजारपेठेत जातेवेळेस मास्क व सामाजिक अंतराचे भान ठेवावे. घरी आल्यानंतर सॅनिटायझर व साबनाने हात स्वच्छ धुवावे. घराच्या आसपास स्वच्छता ठेवावी, असे आवाहनही आरोग्य विभागाने केले आहे.
आतापर्यंत झालेले लसीकरण...
पहिला डोस ३,२१,२३०
दुसरा डोस ९०,४९४
कोविशिल्ड ३, २७,६२४
कोव्हॅक्सिन ८४१००
त्रास झाला तरच परिणामकारक असे अजिबात नाही...
कोविशिल्ड लस असो अथवा कोव्हॅक्सिन लस. या दोन्हीही लस प्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या आहेत. त्रास झाला तरच त्या परिणामकारक आहेत, असे काही नाही. एखादेवेळेस ताप येऊ शकतो किंवा येणार नाही. थोडेबहुत अंग दुखू शकते; परंतु दोन्ही लस या चांगल्याच आहेत.
डॉ. सचिन भायेकर, जिल्हा लसीकरण अधिकारी.
कोविशिल्डचा त्रास अधिक...
कोव्हॅक्सिन लस घेतली तर ताप येत नाही; परंतु कोविशिल्ड लस घेतली तर ताप येतो; परंतु दोन दिवसांनंतर तो उतरतो. काही वेळेस अंगही दुखते. त्यामुळे कोणती लस घ्यावी, हे कळायला मार्ग नाही, अशी प्रतिक्रिया काही नागरिकांनी व्यक्त केली.
लसीनंतर काहीच झाले नाही...
कोरोना महामारीपासून बचाव व्हावा म्हणून कोविशिल्ड लस घेतली. यानंतर एक दिवस ताप आला. अंगही दुखले; परंतु नंतर मात्र काहीच झाले नाही. नागरिकांनी न घाबरता लस घ्यावी.
-गजानन शिंदे, हिंगोली.
कोरोना होऊ नये म्हणून लस घेतली. पहिल्या व दुसऱ्या डोसला अजिबात त्रास झाला नाही. कुणाला ताप येते तर कुणाला येत नाही. तेव्हा नागरिकांनी न घाबरता लसीकरण करून घ्यावे व कोरोनाला पळवून लावावे.
-बालाजी कल्याणकर, हिंगोली.
डमी ११४८