कुरुंदा (जि. हिंगोली) : अनैतिक संबंधाला पती अडसर ठरत आहे हे पाहून पत्नीने प्रियकराच्या मदतीने रात्रीच्यावेळी पतीच्या डोक्यात जोराने लाकूड मारून खून केल्याची घटना भेंडेगाव येथे घडली. पत्नी आणि प्रियकर या दोघांनी मिळून पती शिवाजी राजाराम पोटे (वय ४२) यांचा खून केल्याचे तपासाअंती समोर आले. या प्रकरणी दोन आरोपींना कुरुंदा पोलिसांनी अटक केली.
भेंडेगाव येथील एका शेतात तीन वर्षांपासून सालगडी म्हणून शिवाजी पोटे हा काम पाहत होता. तो गवळेवाडी (ता. औढा नागनाथ) येथील मूळ रहिवासी असून, कामासाठी भेंडेगाव येथे राहत होता. परंतु, रविवारी सकाळी शेतातील आखाड्यावर त्याचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी राजकुमार केंद्रे, कुरुंदा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रामदास निरदोडे, पोलिस उपनिरीक्षक कारामुंगे, जमादार भगीरथ सवडकर, आदींसह श्वान पथक, ठसेतज्ज्ञ पथकाने घटनास्थळी भेट दिली.
पत्नीबाबत पोलिसांना आला संशयपती आणि पत्नी दोघे एकत्र आखाड्यावर राहत होते. या प्रकरणी पत्नीला पोलिसांनी विचारपूस केल्यानंतर दाट संशय निर्माण झाला. त्यानंतर पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर हा प्रकरण उघडकीस आला. अनैतिक संबंधाला पती अडसर ठरत असून, त्यातून वाद निर्माण होत होता. त्यामुळे पतीचा काटा काढण्याचे नियोजन आखत रात्रीला शिवाजी पोटे याच्या डोक्यात लाकडाने जोरदार वार करण्यात आला. या जोरदार घावामुळे तो जागीच ठार झाला, असे पोलिसांनी सांगितले.
दोघांना केली पोलिसांनी अटकपत्नी व प्रियकर या दोघांनी हा खून केला. आरोपी ज्ञानेश्वर ठोंबरे (रा. सारंगवाडी, ता. औंढा), मंगलाबाई पोटे (रा. गवळेवाडी, ता. औंढा) या दोघांना पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती दिली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत कुरुंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.