हिंगोलीत चोरट्यांनी २ लाख ८० हजारांची रक्कम लांबविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:30 IST2021-09-03T04:30:10+5:302021-09-03T04:30:10+5:30
हिंगोली : पैसे पडल्याचे सांगत दुचाकीला अडकविलेली २ लाख ८० हजार रुपयांची रक्कम ठेवलेली बॅग चोरट्यांनी पळविली. ही घटना ...

हिंगोलीत चोरट्यांनी २ लाख ८० हजारांची रक्कम लांबविली
हिंगोली : पैसे पडल्याचे सांगत दुचाकीला अडकविलेली २ लाख ८० हजार रुपयांची रक्कम ठेवलेली बॅग चोरट्यांनी पळविली. ही घटना हिंगोली शहरातील खुराणा पेट्रोल पंपाजवळ २ सप्टेंबर रोजी दुपारी घडली. पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेजवरून चोरट्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. हिंगोली शहरातील मोंढ्यातील व्यापारी विक्रम अग्रवाल यांच्याकडे राजू बेंगाळ हे कामाला आहेत. गुरुवारी दुपारी बेंगाळ बँकेत पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यांनी बँकेतून २ लाख ८० हजार रुपये काढून बॅगमध्ये ठेवले. पैशाची बॅग दुचाकीला अडकवून ते मोंढ्याकडे निघाले होते. त्यांची दुचाकी खुराणा पेट्रोल पंपाजवळ आली असता तेथे थांबलेल्या एका चोरट्याने तुमचे दीडशे रुपये पडले असे सांगितले. त्यामुळे बेंगाळ यांनी दुचाकी थांबवून दीडशे रुपये घेण्याचा प्रयत्न केला. मात्र या संधीचा फायदा घेत दुसऱ्या चोरट्याने दुचाकीला अडकविलेली पैशाची बॅग पळविली. या वेळी बेंगाळ यांनी मदतीसाठी आरडाओरड केली. मात्र तोपर्यंत चोरट्यांनी दुचाकीवरून पळ काढला होता. घटनेची माहिती मिळताच साहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, स्थागुशाचे उदय खंडेराय, शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक पंडित कच्छवे, पोलीस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, नितीन केणेकर आदींच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. तसेच घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासणीचे काम सुरू केले आहे. या प्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात सायंकाळपर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.