हिंगोलीत पेट्रोल ९७.८७, तर डिझेल ८७.५९
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 04:18 IST2021-02-22T04:18:36+5:302021-02-22T04:18:36+5:30
हिंगोली : मागील तीन-चार महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दररोजच वाढ होत असल्यामुळे वाहनचालक कमालीचे त्रस्त झाले आहेत. वाहने ...

हिंगोलीत पेट्रोल ९७.८७, तर डिझेल ८७.५९
हिंगोली : मागील तीन-चार महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दररोजच वाढ होत असल्यामुळे वाहनचालक कमालीचे त्रस्त झाले आहेत. वाहने घरात ठेवण्याची वेळ सध्या सर्वांवरच येऊन ठेपल्याचे शहरात पहावयास मिळत आहे. दरम्यान, काही वाहनचालकांनी जिल्हा प्रशासनाला निवेदन देणार असल्याचे सांगितले.
डिसेंबर २०२०पासून म्हणजे मागील तीन महिन्यांपासून तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यात दुचाकींची संख्या एक लाख ५३ हजार ९६, तर चारचाकींची संख्या १४ हजार ६८३ एवढी आहे. दर दोन दिवसाला पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिक कमालीचे वैतागले आहेत.
१ डिसेंबर रोजी २०२० रोजी पेट्रोलचे दर ९० रुपये ८ पैसे, तर डिझेलचे दर ७८ रुपये ८६ पैसे होते, १ जानेवारी २०२१ रोजी ९१ रुपये ३७ पैसे, तर २ फेब्रुवारी रोजी ९३ रुपये ८५ पैसे दर राहिला होता. २१ फेब्रुवारी रोजी पेट्रोल ९७ रुपये ८७ पैसे, तर डिझेल ८७ रुपये ५९ रुपयांनी विक्री होताना दिसून आले.
जिल्हा प्रशासनाला निवेदन देणार
पेट्रोल व डिझेलचे वाढते दर परवडेना झाले आहेत. पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या दरामुळे वाहने घरातच ठेवण्याची वेळ आली आहे. केंद्र व राज्य शासनाने या संदर्भात विचार करून इंधन दरवाढ करून सर्वसामान्यांना दिलासा देणे गरजेचे आहे. या संदर्भात लवकरच जिल्ह्यातील वाहनचालक, ऑटो संघटनांची बैठक घेऊन एक संयुक्त निवेदन जिल्हा प्रशासनाला दिले जाईल, अशी माहिती जय भगवान महासंघाचे जिल्हाध्यक्ष विलास आघाव, जय संघर्ष वाहनचालक संस्थेचे अध्यक्ष सुभाष झाडे पाटील, ऑटो संघटनेचे सदस्य मुरली कल्याणकर, सुग्रीव दराडे यांनी दिली.