कळमनुरी (जि. हिंगोली) : दगडाने ठेचून ग्यानबाराव भुजंगराव वडकुते (वय ५०, रा. उमरा ता.कळमनुरी) या व्यक्तीचा निर्घृण खून करून मृतदेह हिंगोली ते नांदेड महामार्गावर कळमनुरी कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील रस्त्याच्या कडेला फेकल्याची घटना २५ मार्च रोजी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी एकाविरुद्ध कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
कळमनुरी शहरालगत असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीसमोरील एका ढाब्याजवळ २४ मार्च रोजी रात्री १०:३० वाजण्याच्या सुमारास ग्यानबाराव वडकुते यांचा दगडाने मारून खून करण्यात आला. मंगळवारी सकाळी काही नागरिकांना रस्त्याच्या कडेला मृतदेह आढळला. ही माहिती कळमनुरी पोलिस ठाण्यात देण्यात आल्यानंतर पोलिस निरीक्षक मोहन भोसले, सहायक पोलिस निरीक्षक रघुनाथ शेवाळे, पोलिस उपनिरीक्षक संतोष इंगळे, जमादार माधव भडके, प्रशांत शिंदे, जगन पवार, गुलाब जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह कळमनुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला.
घटनास्थळी श्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते. या प्रकरणी मृताची पत्नी मीरा ग्यानबाराव वडकुते यांच्या फिर्यादीवरून गणपतसिंह टाक (रा. कळमनुरी) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून, पैशाच्या कारणातून हा खून केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलिस निरीक्षक रघुनाथ शेवाळे अधिक तपास करीत आहेत.