प्लास्टिकमुक्तीसाठी हिंगोली न.प.ची पुन्हा मोहीम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 00:26 IST2017-12-20T00:26:29+5:302017-12-20T00:26:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क हिंगोली : नगर परिषदेच्या ठरावाद्वारे शहरात प्लास्टिक पिशव्यांच्या वापरास बंदी घातली असती तरीही त्यांची सर्रास विक्री ...

प्लास्टिकमुक्तीसाठी हिंगोली न.प.ची पुन्हा मोहीम सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : नगर परिषदेच्या ठरावाद्वारे शहरात प्लास्टिक पिशव्यांच्या वापरास बंदी घातली असती तरीही त्यांची सर्रास विक्री व वापर सुरू असून याविरोधात पुन्हा एकदा मोहीम सुरू झाली. आज चार ते पाच किलो पिशव्या जप्त केल्या आहेत.
शहरामध्ये प्लास्टिक कॅरीबॅगचा वापर होवू नये, म्हणून दक्षता पथके नेमलेली आहेत. या पथकांमार्फत शहरातील व्यापारी प्लास्टिक कॅरीबॅग वापरत असल्यास त्या जप्त करून दंडात्मक कारवाई करण्यात येते. त्यानुसार नियुक्त केलेल्या प्लास्टीक पिशवी दक्षता समितीमार्फत शहरातील व्यापारी, दुकानदार, पानटपरी, हॉटेल्स, भाजी, फळ विक्रेते, मेडिकल, प्लास्टिक पिशवी विक्रेते आदी सर्वांनी प्लास्टिक वापरू नये, असे सुचित केलेले आहे. त्यांच्या दुकानांमध्ये आढळून आल्यास संबंधीतांवर नगर परिषद ठरावानुसार प्रथम गुन्ह्यास १ हजार, दुसºया गुन्ह्यास २ हजार, तिसºया गुन्ह्यास ३ हजार आकारावा व त्यानंतर पोलीस कार्यवाही करण्यासाठी आदेश देण्यात आलेले आहे.
शहरातील विविध असोशिएशनच्या (किराणा, कापड व्यवसाय, मेडिकल, डॉक्टर्स, स्टेशनरी, मांस विक्रेते, भाजी विक्रेते यांना २९ नोव्हेंबर २०१७ रोजी पुन:श्च प्लास्टिक पिशव्या वापरण्यात येवू नये म्हणून सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार १९ डिसेंबर रोजी या कार्यालयाच्या प्लास्टिक पिशवी दक्षता समितीमार्फत प्रत्यक्ष बाजारपेठेत जावून तपासणी पिशव्या अंदाजे ४ ते ५ किलो जप्त करण्यात आले. त्यांच्याकडून ९०० रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे.
वरील दक्षता समितीमार्फत वेळोवेळी बाजारपेठेमध्ये जावून प्लास्टिक पिशव्या आढळल्यास दंड आकारणी येत आहे. या उपरांतही स्थानिक बाजारपेठेत किंवा इतरत्र प्लास्टिक पिशव्यांचा वापर केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधीताविरूद्ध गुन्हा नोंद करण्यात येईल, अशी ताकिद दिली आहे. आता स्वच्छ सर्वेक्षण कार्यक्रमामुळे तसे होईल, असे दिसतही आहे.