- इब्राहीम जहागिरदारकुरुंदा (जि. हिंगोली ) : केदारनाथ येथे दर्शनासाठी गेलेल्या कुरुंदा येथील भाविकाचा हृदयविकाराने मृत्यू झाला. या घटनेमुळे कुरुंदा गावावर शोककळा पसरली आहे. सुभाष शातलवार (६८) असे मृत्यू झालेल्या भाविकाचे नाव आहे. केदारनाथाच्या पायथ्याशी सोनप्रयाग येथे कुटुंबासह मुक्कामी थांबलेले असताना अस्वस्थपणा जाणवत असताना अचानक त्यांचा मृत्यू झाला.
तेमीवसमत तालुक्यातील कुरुंदा येथील ८ ते १० भाविक २३ जून रोजी श्री केदारनाथ येथे दर्शनासाठी निघाले आहेत. या सर्व भाविकांचा भुसावळ मार्गे प्रवास सुरु झाला. त्यांच्यासोबत कुरुंदा येथील कापड व्यावसायिक सुभाष शातलवार (वय ६८) पत्नी, दोन मुलीसह मार्गस्थ झाले. हरिद्वार, सोमनाथ, द्वारका आदी ठिकाणी दर्शन घेऊन ते श्री केदारनाकडे निघाले होते.
दरम्यान, केदारनाथच्या पायथ्याशी असलेल्या सोनप्रयाग येथे १ जुलै रोजी रात्री एका लॉजमध्ये सर्वांनी मुक्काम केला. २ जुलै रोजी सकाळी काहीजण केदारनाथ येथे जाण्यासाठी निघाले. परंतु सुभाष शातलवार व त्यांची पत्नी चंद्रकला शातलवार आणि अन्य दोघे लॉजवरच थांबले होते. बुधवारी सकाळच्या सुमारास सुभाष शातलवार यांना बोलताना त्रास होऊ लागला होता. धाप लागल्यासारखे होत असल्याने ते अस्वस्थ झाले होते. तातडीने स्थानिक डॉक्टरला बोलावून घेतले. परंतु काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला.
कुरुंदा गावावर पसरली शोककळा...कापडा व्यापारी सुभाष शातलवार यांच्या मृत्यूची माहिती कुरुंदा येथे पोहोचताच गावावर शोककळा पसरली. मयत शातलवार यांचा मृतदेह रुग्णवाहिकेद्वारे रुद्रप्रयाग येथून कुरुंदा येथे गावाकडे पाठविण्यात आला आहे. मयत सुभाष शातलवार यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, चार मुली असा परिवार आहे.