वसमत : वसमत तालुक्यातील रांजोना शिवारात भुईमुगाच्या पिकात गांजाची शेती होत असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईमुळे ५ मे रोजी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आले. पथकाने ८७ हजार रुपये किमतीची गांजाची लहान-मोठी झाडे जप्त केली. या प्रकरणी हट्टा पोलिस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा नोंद झाला.
वसमत तालुक्यातील रांजोना शिवारात रामदास विठ्ठल साळवे (रा. रांजोना) यांची शेत गट क्रमांक ७२ मध्ये शेती आहे. त्यांनी शेतात भुईमुगाचे पीक घेतले आहे. या पिकांत गांजाची झाडे असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यावरून पथकाने ५ मे रोजी सायंकाळच्या सुमारास छापा मारला. यावेळी भुईमुगाच्या पिकात विनापरवाना बेकायदेशीर गांजाची झाडे लावून त्यांची जोपासना व संवर्धन करीत असल्याचे समोर आले. पथकाने ८७ हजार रुपये किमतीची व ४.३७० किलोग्रॅम वजनाची गांजाची लहान-मोठी सहा झाडे जप्त केली.
या प्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे यांच्या फिर्यादीवरून रामदास विठ्ठल साळवे याच्याविरुद्ध हट्टा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. ही कारवाई प्रभारी पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी राजकुमार केंद्रे, पोलिस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, सहायक पोलिस निरीक्षक संग्राम जाधव, पोलिस अंमलदार कृष्णा चव्हाण, नितीन गोरे, गजानन पोकळे, आकाश टापरे, नरेंद्र साळवे, आझम प्यारेवाले, साईनाथ कंठे, हरिभाऊ गुंजकर, प्रितम चव्हाण, दिंडे, आसीफ, सुरूसे यांच्या पथकाने केली.