साथरोग आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य केंद्रांनी उपाययाेजना कराव्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:33 IST2021-08-12T04:33:36+5:302021-08-12T04:33:36+5:30
हिंगोली : गत काही दिवसांपासून वातावरणात बदल झाला असून, साथरोगांचे प्रमाण वाढत आहे. यामुळे तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी प्राथमिक आरोग्य ...

साथरोग आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य केंद्रांनी उपाययाेजना कराव्यात
हिंगोली : गत काही दिवसांपासून वातावरणात बदल झाला असून, साथरोगांचे प्रमाण वाढत आहे. यामुळे तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रांना तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नामदेव कोरडे यांनी दिली.
प्रत्येक गावामध्ये नियमित कीटकशास्त्रीय सर्वेक्षण करावे, ग्रामसभांमध्ये साथरोगाबाबत जनजागरण करावे, प्रयोगशाळा तंत्रज्ञामार्फत रक्तनमुने तपासणी करून तत्काळ त्याचा अहवाल उपलब्ध करून घ्यावा, जलसुरक्षक यांना तत्काळ याबाबत प्रशिक्षण द्यावे, नियमित पाणी शुद्धीकरण व ओटी टेस्टची नोंद करून नोंदवही ठेवावी, दूषित पाणी नमुना आढळून आल्यास सर्वप्रथम या स्रोतांचे ताबडतोब निर्जंतुकीकरण करून संबंधित ग्रामपंचायतीला लेखी कळवावे, आदी सूचना केल्या आहेत.
गत पंधरा दिवसांपासून वातावरणात बदल झाला असून, ताप, खोकला, सर्दी, डेंग्यू, मलेरिया आदी आजार वाढले आहेत. नागरिकांनी आपल्या घराचा परिसर स्वच्छ ठेवावा. घराच्या आसपास पाणी साचत असेल तर ती जागा कोरडी करून घ्यावी. जेणेकरून डास त्या ठिकाणी घर करून बसणार नाहीत. अंगात ताप असेल तर लगेच जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधणे आवश्यक आहे. साथरोगाबाबत हिंगोली तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, भांडेगाव, सिरसम, फायेगाव, नर्सी नामदेव आदींना सूचना केल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कोरडे यांनी सांगितले.